पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी व सभागृहनेतेपदी कोणाची झाली नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कसबा मतदारसंघाला झुकते माप
विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून हेमंत रासने आणि धीरज घाटे यांनी तयारी केली होती. त्यांच्याऐवजी माजी महापौर मुक्ता टिळक यांना पक्षाने संधी दिल्याने रासने, घाटे नाराज होते. या पार्श्‍वभूमीवर या दोघांना ही पदे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्थायी समिती आणि सभागृहनेता ही महत्त्वाची पदे कसबा मतदारसंघात दिल्याने भाजपच्या वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पुणे - महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांना, तर सभागृहनेतेपदी नगरसेवक धीरज घाटे यांना संधी मिळणार आहे. त्यांच्या नावांची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी केली. दरम्यान, स्थायीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, ‘पीएमपी’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी आपल्या पदांचे राजीनामे दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी विभागीय आयुक्तांमार्फत पुढील आठवड्यात निवडणूक होणार आहे. भाजपकडे बहुमत असल्याने महापालिकेतील सारीच पदे याच पक्षाकडे असून, सत्ता स्थापनेला पावणेतीन वर्षे झाल्यानंतर महापौर, उपमहापौरपदासह काही पदाधिकारी बदलण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. महापौरपद, उपमहापौरांपाठोपाठ स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेताही बदलण्यात आला आहे. ही पदे पटकावण्यासाठी पक्षातील नगरसेवकांत रस्सीखेच होती. 

महापालिकेत रासने हे तिसऱ्यांदा निवडून आले असून, गेल्या दोन वर्षांपासून ते स्थायीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र गटातटाच्या राजकारणाचा फटका बसल्याने रासनेंना हे पद मिळू शकले नव्हते. आता मात्र ही जबाबदारी त्यांच्याकडे चालून आली आहे. तर घाटे हे पहिल्यांदाच निवडून आले असले तरी, आक्रमता आणि ‘फ्लोअर मॅनेजमेंट’मुळे सभागृह सांभाळण्याचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.  

स्थायीचे विद्यमान अध्यक्ष कांबळे आणि पीएमपीचे संचालक शिराळे हे आमदार झाल्याने त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. कांबळे यांचा कार्यकाळ आणखी तीन महिने असल्याने नव्या अध्यक्षांकडे म्हणजे, रासने यांच्याकडील एकूण तेरा महिने स्थायीचा कार्यभार राहणार आहे.

महापालिकांतील पदाधिकारी बदलण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यानुसार पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या पधिकाऱ्यांची निवड होईपर्यंत जुनेच पदाधिकारी कामकाज पाहतील.
- मुरलीधर मोहोळ, महापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune municipal standing committee chairman and meeting house leader selection politics