
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे.
Pune Crime : चेहरा पाहिल्यानंतर समजले की हत्या झालेली व्यक्ती डॉ. दाभोलकर
पुणे - मी घरी असताना सकाळी पावणे आठ वाजता डेक्कन पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराचा फोन आला तेव्हा ओंकारेश्वर पुलावर गोळीबार झाला असून, एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती मला मिळली. जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असताना त्यांचा चेहरा दिसला तेव्हा ते डॉ. नरेंद्र दाभोलकर असल्याचे समजले, अशी साक्ष डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश केंजळे यांनी गुरुवारी(ता.१६) नोंदवली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. हत्येच्या खटला वेळेत निकाली निघावा यासाठी न्यायालयाने आता कालबद्ध कार्यक्रम (टार्इम बॉण्ड प्रोग्रॉम) निश्चित केला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये या खटल्याच्या सुनावणीसाठी ठराविक तारखा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या महिन्यातील पहिल्याच तारखेला केंजळे यांची साक्ष नोंदविण्यात आली. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. प्रकाश सूर्यवंशी या खटल्याचे कामकाज पाहत आहेत.
घटनास्थळी पोहचल्यानंतर मी त्या ठिकाणी दोन जीवंत व दोन मोकळी काडतुसे, फुटका चष्मा, चप्पल आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ती पहिली, असे सांगत ओंकारेश्वर पुलावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचा घटनाक्रम केंजळे यांनी न्यायालयात मांडला. डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोशी घटनास्थळी आले. जोशी यांनी मला रानगट यांची एफआयआर घेण्यास सांगितले. त्यानुसार मी एफआयआर घेतल्यानंतर कलमांची माहिती फोनवरून जोशी यांना कळवली. दुपारी ससून रुग्णालयात गेलेल्या हवालदाराने ससून रुग्णालयातून आणलेल्या २१ वस्तू माझ्यासमोर हजर केल्या. दोन पंच बोलवून त्याचा पंचनामा केला. त्यानंतर तो पंचनामा आणि एफआयआर जोशी यांच्याकडे दिली, असे केंजळे यांनी साक्षीदरम्यान सांगितले.
बचाव पक्षाचे वकील अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी केंजळे यांची उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर यांचा मृत्यू कधी झाला याची माहिती कधी मिळाली असे विचारले असता केंजळे यांनी १२ वाजता असे सांगितले. त्यावेळी जर, १२ वाजता डॉ. दाभोलकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तर मग एफआयआरमध्ये सकाळी साडेनऊ वाजता ३०२ हे कलम लावल्याची बाब अॅड. साळशिंगीकर यांनी निदर्शनास आणून दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या (ता. १७) होणार आहे.