संसाराचं पाणी पाणी

संसाराचं पाणी पाणी

जनता वसाहतीत मुठा उजव्या कालव्याच्या सीमाभिंतीचा काही भाग कोसळून कालव्याला भगदाड पडले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने दांडेकर पूल झोपडपट्टी, पानमळा आणि दत्तवाडीसह सिंहगड रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. या घटनेमुळे शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर पुढील दोन दिवस परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

पुणे/सिंहगड रस्ता - पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांना या कालव्यातून पाणीपुरवठा होतो. सध्या या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे दररोज १४०० क्‍युसेसने कालव्यात पाणी सोडले जाते. आज सकाळी अकराच्या सुमारास दांडेकर पूल येथील सर्व्हे क्रमांक १३२ परिसरात कालव्याच्या सीमाभिंतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे निर्माण झालेल्या भगदाडातून पाण्याचे लोट रस्त्यावर आले. परिणामी, सिंहगड रस्त्यावर सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. रस्त्याच्या एका बाजूला उतार असल्यामुळे हे सर्व पाणी दांडेकर पूल परिसर, सर्व्हे नंबर १३० येथील सुमारे पाचशे घरांमध्ये पाणी शिरले. कालव्याला भगदाड पडून पहिल्यांदाच एवढा मोठा हाहाकार उडाला. 

पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता, की दांडेकर पूल चौक, दांडेकर पूल वसाहत, पानमळा, आंबील ओढ्याचा भाग, राष्ट्र सेवादलाच्या शाळेजवळील परिसरात पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी दोन ते तीन फूट उंचीपर्यंत पाणी साठले होते. रस्त्यावर पाणी वाढल्याने या भागातील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली होती. त्याचा परिणाम शहराच्या पश्‍चिम भागावर झाला. संपूर्ण सिंहगड रस्ता वाहतूक कोंडीत अडकला होता. सुमारे पाचशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील सामान वाहून गेले.

अंगातला कपडाच शिल्लक राहिला
काय सांगू काय गेलं... अंगातला कपडा फक्त शिल्लक राहिला. घराला ना भिंत, ना पत्रा राहिला. घरातील मीठ मिरची, तेल, पीठ... सगळं सगळं वाहून गेलं, साठवलेले लाखभर रुपये अन्‌ अंगावरचे दागिनेही वाहून गेले. आमचा संसार पूर्ण उद्‌ध्वस्त झालाय,’’ हे सगळं आवंढा गिळत अलका भोसले सांगत होत्या. गुरुवारी अकराच्या दरम्यान आलेल्या पाण्यात अलका यांच्या घरातील सर्व साहित्य वाहून गेले.

अलका म्हणाल्या,  ‘‘मुलाने दुसरं घरं घेण्यासाठी बुधवारी एक लाख रुपये घरात आणून ठेवले होते. तेही वाहून गेल्याने आमचं स्वप्नंच पाण्यात वाहून गेलं. आम्ही हातावर पोटभरणारी लोकं, आता काय करायचं. आज रात्री झोपायचं कुठं, हाही प्रश्‍न आमच्या समोर आहे.’’ अलका यांच्यासह त्यांच्या सुनेचे व मुलीचे दागिनेही अचानक आलेल्या पाण्यात वाहून गेले. घरातील कपडे, भांडी, धान्य काहीच राहिले नसल्याने अलका रडत-रडत दुःखाचा आवंढा गिळत सांगत होत्या.

उरला कागदपत्रांचा लगदा 
दांडेकर पुलाच्या खालून जाणाऱ्या नाल्याच्या अगदी कडेलाच सचिन दिवटे यांचे पत्र्याचे छोटे घर होते. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे घराची पत्रे व भिंती पडल्या. त्यामुळे घरातील काही साहित्य वाहून गेले, तर काही घरातच पाण्यावर तरंगत होते. त्यामध्ये त्यांचे व मुलाचे आणि घरासंबंधी महत्त्वाच्या कागदपत्रांची फाइलही तरंगत होती. फाईलमधील सर्व कागदपत्रे पाण्यात भिजून लगदा तयार झाला होता.

दिवटे म्हणाले, ‘‘मी आणि पत्नी दिवसभर रोजंदारी करून घर चालवतो. एक-एक वस्तू मोठ्या कष्टानं गोळा करत होतो. हे सगळं एका झटक्‍यात वाहून गेल्याचं दुःख होतंय.’’ 

... अन्‌ पतीला शोधू लागले !
कालव्याची भिंत फुटली तेव्हा मी सन सिटी येथे सफाई कामासाठी गेले होते. मला तेथे वस्तीत पाणी गेल्याचे समजले. तेथून धावत घरी आले. येऊन पाहते तर सर्वत्र पाणीच पाणी.. एक घर वाहून गेले, तर दुसऱ्या घरात कंबरेएवढे पाणी.. माझे पती आजारी असल्याने घरी झोपून होते, त्यामुळे मला जास्त भीती वाटत होती. हे सगळं सांगताना ललिता चतुर यांना रडू कोसळले.

 ललिता म्हणाल्या, ‘‘रस्त्यावरील गर्दीत पती दिसत नसल्याने मी व माझा मुलगा नदीपात्राच्या कडेने त्यांना शोधत होतो. पाणी कमी झाल्यावर घराकडे धाव घेतली, तर पती घराच्या दारात उभे होते. वस्तीत अचानक पाणी आल्याने त्यांना काही कळायच्या आत घरात कमरेएवढे पाणी साचले होते. त्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना घरातून बाहेर निघता आले नाही.’’ ललिता यांच्या घरातील सर्व वस्तू पाण्यात तरंगत होत्या. शेजारच्या घराची भिंती पडल्याने यांच्या घराच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. 

वाहून गेला संसार
भिंत कोसळल्याने जवळपास ५०० कुटुंबांचे नुकसान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच्या मदतकार्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अनेक घरांमधील साहित्य पाण्यात वाहून गेल्याने मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.
अग्निशामक विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘‘अग्निशामक दल घटनास्थळापर्यंत पोचण्यापूर्वी परिसरातील नागरिक, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्ध, महिला व लहान मुलांना पाण्यातून बाहेर काढून सुखरूप ठिकाणी हलविले. कालव्याला होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. मात्र कालव्यातील पाणी वाहून जाण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत वेळ लागणार आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी १३३ हायफाय लेन व राजेंद्रनगर या सखल भागात ४ ते ५ फुटांपर्यंत पाणी साठले होते. घरांमधून वाहून गेलेल्या वस्तूंमध्ये सिलिंडर मोठ्या प्रमाणात असून, ते काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या ओंकारेश्‍वर पुलाजवळ लावल्या आहेत. या भागातील रहिवाशांना महापालिका शाळांमध्ये हलवले आहे.’’ 

सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी या घटनेबाबत अग्निशमन विभागाला माहिती
पाच अधिकारी अन्‌ ३० ते ३५ जवान त्वरित घटनास्थळी 
अग्निशामक दलाच्या सहा गाड्यांच्या साह्याने मदतकार्य सुरू 
१५ ते २० सिलिंडर जवानांनी पाण्यातून बाहेर काढले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com