पुण्यात 24 लाख कुटुंबांच्या कोरोना सर्वेक्षणासाठी सुमारे 5 हजार पथके

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

घरोघरी जाऊन संशयित कोरोना रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात येतील. मधुमेह, उच्च रक्‍तदाब, किडनी आजार, लठ्ठपणा, दम्याचा आजार असलेल्या अतिजोखमीच्या व्यक्‍ती ओळखून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.

पुणे - कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे 24 लाख 50 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच हजार पथके नेमण्यात आली असून, सुमारे 15 हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक असतील, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. 

"माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींचा शोध घेण्यासाठी ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटिंग या त्रिसूत्रीचा वापर करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन संशयित कोरोना रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात येतील. मधुमेह, उच्च रक्‍तदाब, किडनी आजार, लठ्ठपणा, दम्याचा आजार असलेल्या अतिजोखमीच्या व्यक्‍ती ओळखून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. हे अभियान येत्या 24 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहील. 

हे वाचा - पुण्यातील रिक्षा स्टॅंडसाठी साताऱ्याच्या खासदारांचे विमान वाहतूक मंत्र्यांना साकडं

कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. एका पथकाकडे 50 घरांना भेट देण्याचं नियोजन असणार आहे. या पथकाकडून घरातील प्रत्येक सदस्याची अॅपमध्ये नोंदणी करून घेतली जाईल. एखाद्या सदस्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली तर त्याला रुग्णालयात दाखल केलं जाईल. घरातील व्यक्तींची तपासणी केल्यानंतर घरावर स्टीकर लावलं जाणार आहे. त्यामध्ये घराचा अॅपवरून आलेला क्रमांक, पथकाने किती तारखेला आणि किती वाजता भेट दिली याचा उल्लेख असेल. तसंच पथकाचा क्रमांकही त्यावर नमूद करण्यात येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या 1 कोटी 10 लाख 35 हजार 455 इतकी आहे. तर घरांची संख्या 24 लाख 52 हजार 323 आहे. पुणे जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी 4 हजार 905 पथके असतली. यामध्ये 14 हजार 715 स्वयंसेवक सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune my family my responsibility corona survey 5 thousand team