
पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडाॅर महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले.
Green Corridor : पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडाॅरला हिरवा कंदील!
पुणे - पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडाॅर महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुणे-नाशिक हायस्पीड द्रुतगती रेल्वे मार्गापेक्षा हा कॉरिडॉर पूर्णतः वेगळा असणार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
‘डीपीआर’चे काम सुरू
पुणे-ग्रीन कॉरिडाॅर रस्त्यासंदर्भात ‘एमएसआरडीसी’ने सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करून ती अंतिम टप्प्यात आणली होती. त्यामुळे एकाच वेळी रेल्वे आणि औद्योगिक मार्ग असे दोन पातळ्यांवर काम सुरू होते. त्यामुळे रेल्वे मार्ग आणि ग्रीन कॉरिडाॅर हे दोन्ही एकाच ठिकाणी होणार की स्वतंत्रपणे राबविले जाणार अथवा हायस्पीड रेल्वेला ब्रेक लागणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु ‘एमएसआरडीसी’ने पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडाॅर महामार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
प्रकल्पाची का आहे आवश्यकता?
पुणे हे माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक व सांस्कृतिक शहर.
नाशिक ही कृषी मालाची बाजारपेठ आहे.
नाशिक शहरामध्ये ही मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्यांची स्थापना.
या दोन्ही शहरांमध्ये लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे.
या सर्व बाबींचा विचार करून आणि समृद्धी महामार्ग या माध्यमातून पुण्याला जोडण्यासाठी हा ग्रीन कॉरिडाॅर प्रस्तावित.
महत्त्वाचे टप्पे
रेल्वे मंत्रालयाकडून ‘व्हिजन २०२०’ तयार करण्यात आले आहे.
त्यामध्ये पुणे-नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड द्रुतगती लोहमार्ग बांधण्याचे नियोजित आहे.
या लोहमार्गाची आखणी पूर्ण झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारची मान्यता.
भूसंपादनाचे काम सुरू झाले.
अंतिम मान्यतेचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
असे असतानाच या लोहमार्गाच्या आखणी संलग्न पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी ‘एमएसआरडीसी’ला दिला होता.
त्यावरून हायस्पीड रेल्वे की रस्ता यावरून वाद सुरू झाला होता.
प्रस्तावित पुणे-नाशिक कॉरिडाॅरची लांबी १७८ कि.मी.
भूसंपादनासह अपेक्षित खर्च २१,१५८ कोटी
संपादित करावी लागणारी जमीन २००० हेक्टर