बारामती: नगरपालिकेला खर्चाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश

मिलिंद संगई
शनिवार, 15 जुलै 2017

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर फिरली सुत्रे
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर सुनील सस्ते यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी सूत्रे फिरवली, त्या नंतर लगेचच संध्याकाळी बारामतीच्या मुख्याधिका-यांना चौकशीचे आदेश दिले गेले. डुकराच्या बिला प्रकरणी तर दोनच दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बारामती : नगरपालिकेच्या डुक्कर पकडण्याच्या बिलाबाबत तसेच नगरपालिका निवडणूक काळात झालेल्या विविध खर्चाबाबत झालेल्या तक्रारींची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी यांनी मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना दिले आहेत. 

नगरसेवक सुनील सस्ते यांनी नगरपालिकेने दोन महिन्यात 580 डुकरे पकडण्यापोटी 2 लाख 49 हजार 400 रुपयांचे बिल अदा केल्याच्या प्रकरणी चौकशीची मागणी जिल्हाधिका-यांकडे केली होती. हा सर्व प्रकार संशयास्पद असून बारामतीत इतक्या मोठ्या संख्येने डुकरे नसताना व डुकरे पकडून ती शंभर किमी दूर नेऊन कोठे व कशी सोडली या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

नगरपालिका निवडणुकीमध्ये व्हिडिओ चित्रीकरणासाठी ई निविदा प्रक्रीया न राबविता तीन लाखांच्या आतील पाच देयके दाखल करुन त्या पोटी 12 लाख 44 हजार रुपयांचे बिल एकाच व्यक्तीच्या नावाने एकाच धनादेशाने अदा केलेले आहे. या व्हाऊचरवर तत्कालिन नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्या सह्या नसतानाही बिल मुख्याधिका-यांनी स्वताःच्या अधिकारात अदा कसे केले, आठशे सीडी तयार करण्यापोटी हे बिल दिलेले असल्याने त्या सीडी पाहायला मिळाव्यात अशी मागणी करुनही त्या दिलेल्या नसल्याने या प्रकरणात चौकशीची गरज सस्ते यांनी नमूद केली होती. या शिवाय मंडप उभारणीही ई निविदा न करता केली व त्यालाही साडेपाच लाखांचे बिल अदा केले. छपाई व केटरिंगच्या कामासाठीही सव्वा चार लाखांचे व दोन लाख 86 हजारांचे बिल अदा करण्यात आले आहे. या सर्व खर्चाची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिका-यांना सस्ते यांनी केली होती. 

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर फिरली सुत्रे
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर सुनील सस्ते यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी सूत्रे फिरवली, त्या नंतर लगेचच संध्याकाळी बारामतीच्या मुख्याधिका-यांना चौकशीचे आदेश दिले गेले. डुकराच्या बिला प्रकरणी तर दोनच दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Pune new Baramati municipal council expanditure