पुणे: दोघांना अडकविण्यासाठी रचला बलात्काराचा बनाव

police
police

उरुळी कांचन - वैयक्तिक भांडणातून दोन तरुणांवर बलात्काराचा खोटा आरोप करून, त्यांना तुरुंगात पाठविण्याचा नगर जिल्ह्यातील दोन गुंडांनी केडगाव परिसरातील एका महिलेला हाताशी धरून रचलेला कट पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला. 

उरुळी कांचन- जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट निघाली आहे. नारायणगव्हाण (ता. पारनेर, जि. नगर) परिसरातील दादा गव्हाण व संदीप जगदाळे या गुडांनी पूर्ववैमनस्यातून आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण व अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी केडगाव (ता. दौड) परिसरातील महिलेला हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. फॉर्च्युनर मोटारीतून आलेल्या दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याची साक्ष देणारे दोन तरुणही गव्हाण व जगदाळे यांनी पैसे देऊन उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित महिलेनेही गव्हाण व जगदाळे यांच्या सांगण्यावरून खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली आहे. 

देवदर्शन घेऊन नारायणपूरहून परतत असताना, मोटारीमधून आलेल्या दोघांनी घाटात बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली होती. त्या दोघांना तसेच त्यांच्या गाडीचा नंबर पाहिलेले दोन साक्षीदारही तिने उभे केले होते. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह लोणी काळभोर पोलिसांनी वेगवेगळी पथके बनवून, तपासाला गती दिली. मात्र महिलेच्या तक्रारीत त्रुटी असल्याने, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांनी या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व स्थानिक पोलिसांच्या सलग 48 तासांच्या तपासानंतर हा कट प्रकाश चव्हाण व अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी रचल्याचे निष्पन्न झाले. 
चव्हाण व नवले यांच्याशी दादा गव्हाण यांचा काही वर्षांपासून वाद आहे. आठ दिवसांपूर्वी गव्हाण व जगदाळे यांनी त्या दोघांना लवकरच खडी फोडायला पाठवणार असल्याची धमकीही दिली होती. गव्हाण व जगदाळे यांनी महिलेला मोटारीतून शिंदवणे घाटात फिरवून, प्रात्यक्षिक करून घेतले. विश्रांतवाडी- येरवडा परिसरातून दोन तरुणांना पैशाचे आमिष दाखवून, कटात सहभागी करून घेतले. 

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या तक्रारीतील दोन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते दोघे व फॉर्च्युनर मोटार घटना घडलेल्या दिवशी नारायणगव्हाण परिसरातच असल्याचे निष्पन्न झाले. त्या तरुणांनी दादा गव्हाण व संदीप जगदाळे यांच्याबाबत दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता, महिलेने दिलेली तक्रार बनावट असल्याचे जाणवले आणि वरील कट उघड झाला. दादा गव्हाण व संदीप जगदाळे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाले असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com