ढोल-ताशांचा निनाद, घोषणा अन्‌ जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - तब्बल 98 नगरसेवकांनी फेटे परिधान केल्याने भगवा झालेला महापालिकेचा परिसर, मुख्य सभा, रांगोळ्यांच्या पायघड्या, आवारात फुलांच्या माळांची सजावट, ढोल-ताशांचा निनाद, घोषणा देणाऱ्या अन्‌ जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा वातावरणात शहराच्या महापौरपदी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची झालेली निवड ऐतिहासिक ठरली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अपेक्षेप्रमाणे त्यावर शिक्कामोर्तब झाले. महापालिकेच्या 67 वर्षांच्या इतिहासात भाजप- रिपब्लिकन पक्षाच्या महापौर- उपमहापौरांची पहिल्यांदाच निवड झाली आहे. 

पुणे - तब्बल 98 नगरसेवकांनी फेटे परिधान केल्याने भगवा झालेला महापालिकेचा परिसर, मुख्य सभा, रांगोळ्यांच्या पायघड्या, आवारात फुलांच्या माळांची सजावट, ढोल-ताशांचा निनाद, घोषणा देणाऱ्या अन्‌ जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा वातावरणात शहराच्या महापौरपदी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची झालेली निवड ऐतिहासिक ठरली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अपेक्षेप्रमाणे त्यावर शिक्कामोर्तब झाले. महापालिकेच्या 67 वर्षांच्या इतिहासात भाजप- रिपब्लिकन पक्षाच्या महापौर- उपमहापौरांची पहिल्यांदाच निवड झाली आहे. 

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पाच नगरसेवकांसह भाजपचे पहिल्यांदाच 98 नगरसेवक निवडून आले, त्यामुळे पक्षाने संधी दिलेल्या उमेदवारांचीच महापौर- उपमहापौरपदी निवड होणार असल्याचे निश्‍चित झाले होते. त्यानुसार पुरेपूर मते मिळवीत टिळक आणि कांबळे महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. भाजपचा पहिल्यांदाच महापौर होत असल्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर हेही महापालिकेत आवर्जून उपस्थित होते. महापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. मावळते महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या सभेला महापालिका आयुक्त कुणाल कुमार हेही व्यासपीठावर उपस्थित होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापौरपदासाठी नंदा लोणकर, तर कॉंग्रेसने लता राजगुरू यांची उमेदवारी जाहीर केली होती. माघारीच्या प्रक्रियेत शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार संगीता ठोसर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार विशाल धनवडे यांनी माघार घेतली. त्यामुळे थेट झालेल्या निवडणुकीत टिळक आणि कांबळे यांना प्रत्येकी 98, तर लोणकर, राजगुरू यांना प्रत्येकी 52 मते मिळाली. त्यामुळे महापौर म्हणून टिळक आणि उपमहापौर म्हणून कांबळे प्रत्येकी 46 मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे 10 नगरसेवक तटस्थ राहिले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य वसंत मोरे, साईनाथ बाबर यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. "एमआयएम'च्या नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांनी राष्ट्रवादी- कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. हात वर करून झालेल्या मतदानात कोणत्याही पक्षाचे एकही मत फुटले नाही, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

सौरभ राव आणि नगरसचिव सुनील पारखी यांनी निकाल जाहीर केल्यावर प्रशांत जगताप यांनी टिळक यांचे अभिनंदन केले. त्या वेळी बापट, गोगावले, शिरोळे, काकडे आणि आमदारांनी सभागृहात प्रवेश करून त्यांना शुभेच्छा दिल्या. टिळक यांचे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल यांनी आईचे अभिनंदन केले. महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी टिळक यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सभागृहाचे कामकाज विस्कळित झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसच्या सदस्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त कुणाल कुमार यांनाही गर्दीचा फटका बसला. त्यानंतर महापौर टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे मतदान महापौरपदाच्या निवडणुकीसारखेच झाले. कांबळे यांना उपमहापौर म्हणून घोषित केल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महापौर टिळक आणि उपमहापौर कांबळे यांच्या अभिनंदनपर नगरसेवकांची भाषणे झाल्यावर सभेचे कामकाज 21 मार्चपर्यंत तहकूब करीत असल्याचे महापौर टिळक यांनी जाहीर केले. 

Web Title: Pune New mayor & Dy Mayor