मेट्रोनंतर "बीआरटी'चे काय? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पुणे - ""मेट्रोचे मार्ग सुरू झाल्यानंतरही बीआरटी मार्गावरील वाहतूक सुरू ठेवता येईल का? या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन महामेट्रोने केले आहे. तसेच नगर रस्त्यावरून मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने बीआरटीचे काय करायचे, याचे सर्वेक्षणही सुरू केले आहे. 

पुणे - ""मेट्रोचे मार्ग सुरू झाल्यानंतरही बीआरटी मार्गावरील वाहतूक सुरू ठेवता येईल का? या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन महामेट्रोने केले आहे. तसेच नगर रस्त्यावरून मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने बीआरटीचे काय करायचे, याचे सर्वेक्षणही सुरू केले आहे. 

नगर रस्त्यावर मेट्रो मार्ग एलिव्हेटेड आहे. या रस्त्यावर मध्यभागात मेट्रोचे खांब उभारले जाण्याची शक्‍यता आहे. सध्या तेथे बीआरटी धावते. त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रोचे काम सुरू झाल्यावर बीआरटी मार्गाचे काय करायचे, असा प्रश्‍न महामेट्रोपुढे निर्माण झाला आहे. त्या बाबत सध्या विविध पर्यायांवर विचार सुरू आहे, असे दीक्षित यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्येही बीआरटी आहे. परंतु त्या ठिकाणी एकाही बस थांब्याला महामेट्रोने हात लावलेला नाही. मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होईपर्यंत बीआरटी हा पर्याय उत्तम आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. 

मेट्रो-बीआरटी प्रत्येकी 100 किलोमीटरची? 
शहरात 100 किलोमीटरचे जाळे उभारण्याचा मनोदय महामेट्रोने व्यक्त केला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर येत्या पाच वर्षांत बीआरटीचे सुमारे 110 किलोमीटरचे मार्ग निर्माण करायची आहेत. परंतु एकाच मार्गावर मेट्रो आणि बीआरटी सुरू झाल्यास दोन्ही यंत्रणांना प्रवासी कसे मिळणार, असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्‍यकता असल्याचे महामेट्रोचे म्हणणे आहे. 

मेट्रोबरोबर बीआरटीही हवी 
एका तासाला, एका दिशेला 20 हजारापर्यंत नागरिक जात असतील तर त्या ठिकाणी बीआरटी उपयुक्त असते. परंतु एका तासाला, एका दिशेला 20 हजार ते 1 लाखांपर्यंत नागरिक जात असतील, तर त्यांच्यासाठी मेट्रो हाच चांगला पर्याय ठरतो. भविष्यात विस्तारणाऱ्या शहराचा आणि वाढीव प्रवाशांचा विचार करून या बाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शहरातील बीआरटी आणि मेट्रो मार्गांच्या प्रकल्प आराखड्यांत प्रवाशांच्या संख्येचा आणि वाढीचा विचार झाला आहे. त्यामुळे दोन्ही पर्याय हवेत, असेही तज्ज्ञांचा एक गट म्हणत आहे. 

पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मेट्रोच्या मार्गांमध्ये अनेक ठिकाणी बीआरटीचे मार्ग आहे. मेट्रो सुरू झाल्यावर बीआरटीचे हे मार्ग सुरू ठेवायचे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मेट्रो मार्गांपासून पीएमपीची फिडर सेवा अपेक्षित आहे. बीआरटी मार्गावर कमी अंतराच्या स्टॉपवर बस थांबू शकते तर, मेट्रो का थांबू शकत नाही. त्यामुळे या दोन्ही सेवा कार्यरत राहू शकतात, मात्र या बाबत धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा. 
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो 

Web Title: pune new metro BRT