पालखी सोहळ्यासाठी दीडशे जादा बस गाड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पुणे - संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पीएमपीने सुमारे १५० जादा बसचे नियोजन केले आहे. १७ जूनला मध्यरात्रीपर्यंत आळंदीला जाण्यासाठी ६५, तर देहूला जाण्यासाठी ३२ बस प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत. 

पुणे - संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पीएमपीने सुमारे १५० जादा बसचे नियोजन केले आहे. १७ जूनला मध्यरात्रीपर्यंत आळंदीला जाण्यासाठी ६५, तर देहूला जाण्यासाठी ३२ बस प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत. 

आळंदीला जाण्यासाठी स्वारगेट, महापालिका, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरी रोड येथून, तसेच देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा, निगडी येथून बस उपलब्ध असतील. या दोन्ही ठिकाणी १८ जूनला पहाटेपर्यंत प्रवाशांना जाता येईल. पालखीचे प्रस्थान १८ जून रोजी होत आहे. त्यामुळे त्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा येथून ३२ जादा बसची व्यवस्था केली आहे. मार्गावरील नेहमीच्या बसशिवाय ५५ बस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडीपर्यंत उपलब्ध असतील.

पुण्यात पालख्या प्रस्थानाच्या वेळी २० जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२ ते १ दरम्यान थांबणार आहेत. 

त्या वेळेस महात्मा गांधी स्थानकावरून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध असेल. तसेच कात्रज-कोंढव्याकडे जाण्यासाठी वानवडीतील शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवेची व्यवस्था केली जाणार आहे. पालखी सोहळा सोलापूर व सासवड रस्त्याने मार्गस्थ होईल, तेव्हा सोलापूर, उरुळी कांचन मार्ग जसा वाहतुकीसाठी खुला होईल, त्या प्रमाणे बस सेवा सुरू केली जाईल. 

प्रस्थानादरम्यान हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यावेळी भाविकांच्या सोयीसाठी दिवेघाटाऐवजी बोपदेव घाट मार्गे बस वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर येथून त्यासाठी ६० जादा बसचे नियोजन केले आहे, अशी माहिती पीएमपीच्या वतीने देण्यात आली.

Web Title: pune news 150 extra bus for palkhi sohala