तेवीस लाखांचे अन्नपदार्थ अडीच महिन्यांत जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे - गणपती, दसरा आणि पाठोपाठ आलेली दिवाळी या अडीच महिन्यांमध्ये भेसळीच्या संशयावरून 22 लाख 85 हजार रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त केला आहे. यात प्रामुख्याने मिठाई, खाद्यतेल, खवा यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पुणे - गणपती, दसरा आणि पाठोपाठ आलेली दिवाळी या अडीच महिन्यांमध्ये भेसळीच्या संशयावरून 22 लाख 85 हजार रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त केला आहे. यात प्रामुख्याने मिठाई, खाद्यतेल, खवा यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सणांच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रीसाठी आणले जात असल्याच्या माहितीच्या आधारावर अन्न व औषध द्रव्य प्रशासनाने विशेष मोहीम राबविली होती. या अडीच महिन्यांत या मोहिमेतून शहरात येणारे संशयित भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.

सणांमध्ये शहरात मिठाई, खवा, खाद्यतेल यांची मागणी वाढते. त्यामुळे यात भेसळ होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये मिठाई, खाद्यतेल, खवा, फरसाण, बेसन, वनस्पती तूप आणि घी यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या अन्नपदार्थांचे 165 नमुने घेण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गुजरात येथून शहरात विक्रीसाठी आलेल्या स्पेशल बर्फीच्या विक्रीची परवानगी येथील विक्रेत्यांकडे नव्हती. अशा प्रकारे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध या मोहिमेतून कारवाई करण्यात आली आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news 23 lakh rupees food seized