पुण्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

पांडुरंग सरोदे
शनिवार, 17 मार्च 2018

राज्य "एटीएस'कडून बांग्लादेशी घुसखोरांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पुणे "एटीएस'कडून माहिती गोळा केली जात होती. त्यामध्ये आकुर्डी व वानवडीमध्ये तीन बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असून त्यांचा बांग्लादेशीतल बंदी असलेल्या "एबीटी' या संघटनेशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पुणे : दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने शनिवारी तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या "अन्सारउल्लाह बांगला टिम (एबीटी) या संघटनेचे तिघेजण हस्तक आहेत. अशी माहिती "एटीएस'ने केलेल्या चौकशीतून पुढे आली आहे. 

राज्य "एटीएस'कडून बांग्लादेशी घुसखोरांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पुणे "एटीएस'कडून माहिती गोळा केली जात होती. त्यामध्ये आकुर्डी व वानवडीमध्ये तीन बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असून त्यांचा बांग्लादेशीतल बंदी असलेल्या "एबीटी' या संघटनेशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पुणे "एटीएस'चे सहायक आयुक्त सुनील दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली. या पथकाने आकुर्डी व वानवडी येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त करण्यात आले. 

तिघांपैकी दोघेजण बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील पुष्पकाली या गावचे रहिवासी आहेत. तर तिसरा नागरिक हा शरियतपुर जिल्ह्यातील बिराककुंडी गावातील आहे. त्यांच्याबाबत सखोल माहिती घेण्याचे काम एटीएसकडून सुरू आहे. त्याद्वारे अटक केलेल्या व्यक्तींचा "अल कायदा' किंवा अन्य दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का ? पुण्यात येण्यामागील हेतू काय होता ? वेगळी कारणे काय आहेत, अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. 

Web Title: Pune news 3 Bangladeshi citizens arrested in Pune