‘पीएमआरडीए’साठी तीन टीएमसी पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये (पीएमआरडीए) तीन टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी देण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा विभागाने ही मागणी मान्य केली आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांनी गुरुवारी दिली. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून पीएमआरडीएला मिळणार आहे. 

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये (पीएमआरडीए) तीन टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी देण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा विभागाने ही मागणी मान्य केली आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांनी गुरुवारी दिली. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून पीएमआरडीएला मिळणार आहे. 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘पुण्याची सद्यःस्थिती आणि विकासाची दिशा’ या विषयावर आयोजित वार्तालापात ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे देखील या चर्चेत सहभागी झाले होते. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे आणि सरचिटणीस दिगंबर दराडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

गित्ते म्हणाले, ‘‘महापालिकेतर्फे पुण्यात चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्याची मागणी कमी होईल. त्यानंतर खडकवासला धरणातील पाणी पीएमआरडीएला उपलब्ध होईल.’’

पीएमआरडीएमध्ये नव्याने होणाऱ्या विकासाला पाणीपुरवठा करू शकत नाही. ग्रामपंचायतींकडे उपलब्ध स्रोतांमध्ये भर घालून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पीएमआरडीएची आहे. त्याबाबत बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पीएमआरडीएला तीन ‘टीएमसी’ पाणी देण्याचा निर्णय झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुणाल कुमार म्हणाले, ‘‘चोवीस तास पाणी योजनेतून पाणी गळती कमी होईल. त्यातून आज वापर होत असलेल्या पाण्याच्या पन्नास टक्‍के पाणी पुण्याची गरज भागवू शकेल.’’

पश्‍चिम पुण्यात मागील वीस वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा विकास झाला आहे. यात रहिवासी क्षेत्राबरोबरच औद्योगिक वाढही जोमात झाली. हिंजवडी आणि त्या परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या बारा लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा योजना करण्यात येत आहे. त्यात ७५ टक्के निधी हा खासगी क्षेत्रातून उभारण्यात येणार आहे. प्रकल्प विकास करताना एका सदनिकेला वीस हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. पूर्व भागात वाघोली या भागात तीन ते चार लाख लोकसंख्येची भर पडली आहे. त्यांना इंद्रायणी आणि भीमा नदीच्या संगमातून पाणीपुरवठ्याची योजना करत आहे. वेगवेगळ्या भागात उभारण्यात येणाऱ्या १२ टाउनशिपला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्‍त, पीएमआरडीए

Web Title: pune news 3 tmc water for pmrda