रिक्षा परवान्यासाठी तीन हजार अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

अर्जांची छाननी सोमवारपासून; दररोज शंभर अर्जदारांना अपॉइंटमेंट

अर्जांची छाननी सोमवारपासून; दररोज शंभर अर्जदारांना अपॉइंटमेंट
पुणे - रिक्षा परवाना मिळविण्यासाठी एनआयसीने तयार केलेल्या संकेतस्थळावरून आतापर्यंत तीन हजार नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी सोमवारपासून (ता. 7) करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. तसेच, दररोज शंभर रिक्षाचालकांना अपॉइंटमेंट देऊन आरटीओमध्ये बोलविण्यात येणार आहे.

रिक्षा परवानावाटपाचे काम ऑनलाइन पद्धतीने व्हावे, यासाठी दिल्ली एनआयसीने संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने आतापर्यंत तब्बल तीन हजार रिक्षाचालकांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. अर्जदारांना एसएमएसद्वारे अर्जाच्या छाननीसाठी अपॉइंटमेंट देण्यात येणार आहे. त्यासाठी "आरटीओ'त दररोज शंभर रिक्षाचालकांना बोलावले जाईल. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित रिक्षाचालकांना घरपोच इरादापत्र पाठविले जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

रिक्षाचालकांच्या अर्ज व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्यांना परवान्यासाठी पुन्हा "आरटीओ'त येण्याची गरज नाही. कागदपत्र पात्र आहेत की नाही, शुल्क जमा झाले आहे का, इरादापत्र कधीपर्यंत मिळेल, ही सर्व माहिती त्यांना एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिक्षा परवान्यासाठीची वेबसाइट बंद पडणे, पैसे जमा झाल्याची पावती न मिळणे, ऑनलाइन पैसे भरताना अडचणी येणे आदी प्रकारांमुळे रिक्षाचालकांनी घाबरू नये. त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी "आरटीओ' सक्षम आहे. ना पैसे बुडणार, ना रिक्षा परवान्याचा कोटा संपणार. मात्र, संकेतस्थळावर पैसे भरताना एरर दाखवत असल्यास वारंवार पैसे भरू नये, त्यामुळे नुकसान होऊ शकते.
- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: pune news 3000 form for rickshaw permit

टॅग्स