पारंपरिक शेती योजनेत ४० गट स्थापन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सेंद्रिय शेती उत्पादन सुरू; ग्राहकांमध्ये जागृतीची गरज

पुणे - पारंपरिक शेती योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ४० गट स्थापन झाले असून, दोन हजार एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती उत्पादन सुरू झाले आहे. देशात मध्यप्रदेश या क्षेत्रात अग्रस्थानी असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा या क्षेत्रात पंधरावा क्रमांक लागतो. यात वाढ होण्यासाठी व्यावहारिक उपाय आणि ग्राहकांमध्ये आणखी जागृतीची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

कोणत्याही रसायनांचा वापर न करता शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. शेतकऱ्यांचे गट तयार करणे, त्यांना पारंपरिक, सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणे आदींचा या योजनेत समावेश आहे. भारतात मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान यांचा सेंद्रिय शेतीमध्ये वरचा क्रमांक लागतो. केंद्र सरकारच्या योजनेची गेल्या वर्षीपासून पुणे जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्‍यात शेतकऱ्यांचे चाळीस गट तयार केले आहेत. सुमारे दोन हजार एकर क्षेत्र या प्रकारच्या शेतीसाठी वापरले जाऊ लागले आहे. याबाबत ‘आत्मा’चे सुनील बोरकर म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेतीच्या उत्पादनात वाढ होत असली तरी योजनेचे पहिले वर्ष असल्यामुळे निष्कर्षापर्यंत जाता येणार नाही.’’

दौंड येथील शेतकरी वसुधा सरदार यांनी सेंद्रिय शेतमालाच्या विक्रीसाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद केले. ‘‘ग्राहकांची मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जनजागृती हाच पर्याय आहे. रसायनांचा वापर न केलेला शेतमाल आरोग्यास लाभदायक आहे, हे ग्राहकांच्या मनावर बिंबवले पाहिजे. ग्राहकही या प्रकारच्या शेतमालाकडे तेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत. सेंद्रिय शेती ही इतर पद्धतीपेक्षा थोडी खर्चिक आहे. या प्रकारच्या शेतीत मनुष्यबळाची अधिक आवश्‍यकता भासते. त्यामुळे उत्पादनखर्चही वाढत असतो. यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांचे समाधान होईल असा व्यावहारिक मार्ग काढणे गरजेचे वाटते.’’

२०१५-२०१६ या आर्थिक वर्षात १.३५ दशलक्ष मेट्रिक टन इतके उत्पादन
ऊस, सर्व प्रकारच्या तेलबिया, कडधान्य- डाळी, औषधी वनस्पतींचा समावेश 
२०१५-२०१६ मध्ये सुमारे २ लाख ६३ हजार मेट्रिक टन इतका सेंद्रिय शेतमाल निर्यात
सेंद्रिय शेतमालाच्या एकूण ग्राहकांपैकी ९० ग्राहक उच्चवर्गीय
सेंद्रिय प्रमाणपत्र लवकर मिळण्याची अपेक्षा

Web Title: pune news 40 group in agriculture scheme