चार हजार गुंतवणूकदार न्यायाच्या प्रतीक्षेत

चार हजार गुंतवणूकदार न्यायाच्या प्रतीक्षेत

टेम्पल रोझ रियल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी चार हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची तीनशे कोटींची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात कंपनीच्या संचालकासह एजंटला अटक झाली आहे, तर अन्य संचालक पसार झाले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती पुण्यासह महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतही पसरली आहे. हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांचा न्यायासाठी एकत्रित लढा सुरू असून, त्यांना या लढ्यात पोलिसांची मदतही मिळत आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कसे परत मिळतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी गाव. टेम्पल रोझ रियल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना तेथील ४४० एकर जमिनीवर प्लॉट तयार करून त्यांच्या नावावर करण्याचे आणि जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूकदारांना सहा लाखांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत प्लॉट विकण्यात आले; पण प्लॉट न पाडता आणि त्याचे बिगरशेती (एनए) न करता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. तसेच कंपनीच्या संचालकांनी ती जमीन अकरा जणांना बनावट सामंजस्य करार आणि खरेदीखत करून परस्पर विकली. तसेच गुंतवणूकदारांकडून इन्कम ग्रोथ प्लॅनच्या योजनेखाली मुदत ठेवी स्वीकारून आकर्षक व्याज परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या; मात्र गुंतवणूकदारांना मुद्दल आणि व्याज दोन्ही दिले नाही. या गुन्ह्यात मुंबईतील बांद्रा येथे राहणारा या कंपनीचा चेअरमन देविदास गोविंदराम सजनानी, संचालक दीपा सजनानी, वनिता सजनानी, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या मार्क्‍स योहान थोरात, दहिसर येथील केशव नारायण इदिया आणि पुण्याच्या रहाटणी येथील एजंट रमेश जियंदमल अघीचा यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास करण्यात येत आहे. 

या गुन्ह्यात पोलिसांनी कंपनीचा चेअरमन देविदास सजनानी आणि एजंट रमेश अघीचा या दोघांना नुकतीच अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात काही धक्‍कादायक बाबी समोर आल्या आहेत. चेअरमन सजनानी याने सन २०१० मध्ये टेम्पल रोझ लाइव्ह स्टॉक फार्मिंग प्रा. लि. कंपनीच्या नावावर पिंगोरी येथील जमीन शेतकऱ्यांकडून खरेदी केली होती. त्याने ही जमीन चार हजार गुंतवणूकदारांना प्रस्तावित एनए प्लॉट आणि सर्व्हे क्रमांक टाकून विकली आहे. त्यांना प्लॉट अलॉटमेंट आणि नोटराइज करारनाम्याची प्रत दिली आहे. ही जमीन टेम्पल रोझ लाइव्ह स्टॉक फार्मिंग या कंपनीच्या नावावर खरेदी केली; मात्र गुंतवणूकदारांना विकताना ही जमीन टेम्पल रोझ रियल इस्टेट कंपनीच्या नावावर असल्याचे भासवून विकली आहे. 

रमेश अघीचा हा ‘टेम्पल रोझ’च्या कॅम्प येथील कार्यालयात प्रमुख एजंट म्हणून काम बघत होता. त्याने शेकडो गुंतवणूकदारांना आमिष दाखवून कंपनीत २५ कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यापोटी त्याला एक कोटी रुपयांहून अधिक कमिशन आणि पगार मिळाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील शास्त्रज्ञ, आयटीमधील अभियंता तसेच सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा समावेश आहे. या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. 

पैसे परत मिळेपर्यंत लढा सुरूच... 
सजनानी याने ही जमीन ज्या अकरा जणांना परस्पर विकली आहे, त्यांच्याकडील ‘एमओयू’च्या प्रती पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ‘टेम्पल रोझ’ कंपनीविरुद्ध नितीन तिवारी, पृथ्वीराज परदेशी, मोबीन सनाऊल्ला, आऐशा मोमीन यांच्याह एकूण १४५ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिस या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने करत आहेत. पैसे परत मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. उर्वरित गुंतवणूकदारांनी एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी गुंतवणूकदार समितीचा व्हॉटस्‌ॲप क्रमांक - ९८३४४३०८२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com