४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश

४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश

पहिली यादी जाहीर; गोंधळामुळे तीन तासांचा विलंब
पुणे - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध होणार होती; परंतु ऑनलाइन प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीच्या कारभारातील सावळागोंधळ आड आला आणि तीन तासांच्या विलंबाने रात्री आठ वाजल्यानंतर यादी संकेतस्थळावर पाहायला मिळाली. पहिल्या यादीत ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले, तर १९ हजार ८०६ विद्यार्थ्यांना कोणतेही महाविद्यालय मिळालेले नाही.

पहिल्या यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयात ११ ते १३ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असेल, तर तेथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा, तो विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेबाहेर फेकला जाणार आहे. या फेरीत सुमारे १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाचे संपूर्ण शुल्क भरून प्रवेश घ्यायचा आहे.

पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आणि तेथे प्रवेश घेतला, अशा विद्यार्थ्यांना थेट विशेष फेरीत पुन्हा अर्ज भरण्याची संधीदेखील मिळणार आहे. परंतु या फेरीत रिक्त राहिलेल्या जागेवरच त्यांना प्रवेश मिळेल. त्यामुळे पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे योग्य ठरणार आहे. या विद्यार्थ्यांना इतर फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.

प्रवेशाची माहिती
प्रवेशासाठी आलेले अर्ज              : ७८४३८
कोट्यातून प्रवेशित विद्यार्थी            : १०३०८
केंद्रीय प्रवेशासाठी शिल्लक विद्यार्थी   : ६८१३०
पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश      : ४८३२४
पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही    : १९८०६

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
१४ जुलै - रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचे कटऑफ प्रसिद्धी
१५ ते १८ जुलै - दुसऱ्या फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम अर्ज भरणे
२० जुलै - दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध

अकरावीच्या प्रवेशासाठी या वर्षी नियमावलीत बरेच बदल करण्यात आले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले, तर तेथे प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आल्याने प्रवेश रद्द करण्याचा प्रकार संपला. कोणत्याही फेरीत अर्ज भरण्याची मुभा ठेवण्यात आली, तसेच पसंतीक्रमांची संख्या दहा केल्याने विद्यार्थ्यांना फायद्याचे झाले. दूर अंतरावरील महाविद्यालय मिळण्याचा धोका संपला.
- दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक

वाणिज्यकडे कल
अकरावी प्रवेशासाठी वाणिज्य शाखेला या वर्षी विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिली आहे. या शाखेसाठी ३५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. विज्ञान शाखेऐवजी विद्यार्थ्यांचा या वर्षी वाणिज्य शाखेकडे कल दिसून येत आहे. विज्ञान शाखेसाठी ३३ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. कला शाखेला दरवर्षीप्रमाणे कमी प्रतिसाद आहे. या शाखेसाठी ८ हजार १८१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेश क्षमता आणि प्राप्त अर्जांचा विचार करता, अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशी स्थिती आहे, असे दिनकर टेमकर यांनी सांगितले.

कंपनीची चूक
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध होणार होती. त्याप्रमाणे पालक आणि विद्यार्थ्यांनी पाच वाजता संकेतस्थळावर लॉग इन करण्यास सुरवात केली. परंतु यादी दिसत नव्हती. यामुळे सगळेच धास्तावले. माहितीपुस्तिकेत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर  चौकशी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची तक्रार पालकांनी केली. ऑनलाइन प्रक्रिया राबविणाऱ्या खासगी कंपनीच्या चुकीमुळे यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यास तीन तास विलंब झाल्याचे उपसंचालक कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. रात्री आठ वाजता ही यादी अपलोड झाली.

शाखा    माध्यम    मिळालेले प्रवेश
कला    इंग्रजी    १६४९
          मराठी    ४१९३
वाणिज्य    इंग्रजी    १३२९५
              मराठी    ७७३०
विज्ञान    इंग्रजी    २०५५४
एमसीव्हीसी    इंग्रजी    ३२४
                  मराठी     ५७९
एकूण         ४८३२४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com