झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर - डॉ धेंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पुणे - झोपडपट्टीतील नागरिकांना ५०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळवून देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे आणखी एक वसतिगृह उभारण्यासाठी पाठपुरावा करून नवनाथ कांबळे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही नवनिर्वाचित उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सभागृहात बुधवारी दिली. 

उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यावर महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी डॉ. धेंडे यांचे अभिनंदन केले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘आर्थिक दुर्बल घटक वर्गातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्याबरोबरच महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सत्ताधारी पक्षात असलो तरी, विरोधकांना बरोबर घेऊन काम करण्यावर भर असेल.’’ 

या प्रसंगी बाबूराव चांदेरे म्हणाले, ‘‘उपमहापौरपदाची संधी अनपेक्षितपणे धेंडे यांना मिळाली; रिपब्लिकन चळवळीला आम्ही कायमच साथ दिली त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध केली; परंतु याची जाणीव भाजपने ठेवून उर्वरित गटनेत्यांची नियुक्ती करावी.’’ दीपक मानकर म्हणाले, ‘‘रुग्णसेवा करताना डॉ. धेंडे यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा वापर करून महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्यांनी दिशा द्यावी.’’

या प्रसंगी बापूराव कर्णे गुरुजी, अविनाश साळवे, मंगला मंत्री, सुनील टिंगरे, नंदा लोणकर, शीतल सावंत, वैशाली बनकर, लता राजगुरू यांनीही भाषणांद्वारे धेंडे यांना शुभेच्छा दिल्या.

सभेत उमटले बदल्यांचे पडसाद  
बांधकाम, आरोग्य, पथविभागातील ५२ अधिकाऱ्यांच्या महापालिका आयुक्तांनी केलेल्या बदल्यांचे पडसाद या वेळी उमटले. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनाही विश्‍वासात न घेता आयुक्त बदल्या करीत असतील, तर त्यांना परत पाठवावे लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला; तर सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बातम्या पदाधिकाऱ्यांना वृत्तपत्रांतून वाचायला मिळत आहेत, असे चांदेरे यांनी सांगितले.

Web Title: pune news 500 sq.ft home to slum owner