सहा लाख फेरफार पुन्हा तपासणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - राज्य सरकारने येत्या एक ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व सातबारा, आठ अ आणि फेरफार हे ‘ऑनलाइन’ पद्धतीने देण्याचे ध्येय ठेवले आहे; परंतु ई फेरफारमध्ये अनेक चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत सर्व काम होणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, राज्यातील तब्बल सहा लाख फेरफारमधील चुका पुन्हा तपासाव्या लागणार असल्याची माहिती भू-अभिलेख विभागाकडून देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यभरात झालेल्या सातबारा चावडीवाचनामध्ये हा चुकांचा गोंधळ लक्षात आला आहे. 

राज्यातील पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागांत एकूण सुमारे २२ लाख ७५ हजार ६५२ ई-फेरफार आहेत. त्यापैकी आतापर्यंत १७ लाख ३८ हजार ५७९ फेरफार ऑनलाइन दिले आहेत. त्यापैकी सहा लाख फेरफारमधील चुका पुन्हा तपासाव्या लागणार आहेत. 

ऑनलाइन सातबारा चावडीवाचन, ८ अ आणि ई फेरफारची प्रलंबित कामे एक ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी तलाठी, मंडल, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (प्रांत) आणि जिल्हाधिकारी यांचे सहकार्य घेतले जात आहे. 

तलाठी, मंडल अधिकारी स्तरावर हस्तलिखित सातबारा नोंदींमध्ये प्रचंड चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गट क्रमांक, वारसनोंदी, गहाणखते, बॅंकांचे कर्ज, जमिनीचा प्रकार, क्षेत्र कमी जास्त, नावांमध्ये चुका, ८ अ आणि फेरफारच्या नोंदी न जुळणे अशा चुका झालेल्या आहेत.

राज्यभरातील सहा महसुली विभागांमधील जिल्ह्यांमध्ये ई-फेरफार दाखले ऑनलाइन करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामध्ये सध्या तलाठी कार्यालयातून आलेले फेरफार, दुय्यम निबंधक कार्यालयांमधील दस्तनोंदणी केलेले फेरफार दाखल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हस्तलिखित सातबारांवरील चुकांमुळे ई-फेरफारमध्ये चुका दिसून येत आहेत. त्या पुन्हा तपासून त्रुटीविरहित सातबारा, ई फेरफार केले जातील. 
- एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त

Web Title: pune news 6 lakh Check rectification