सातबारा उताऱ्यालाही ‘आधार’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पुणे - जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संबंधित मालकांच्या नावाबरोबरच आधार क्रमांक नोंदविण्यासाठीची संगणक प्रणाली विकसित केली जात आहे. हे काम अंतिम टप्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधार क्रमांक टाकल्याबरोबर संबंधित मालकाच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यातील एका तालुक्‍यात प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबविण्याचा निर्णय जमाबंदी आयुक्तांनी घेतला आहे.

पुणे - जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संबंधित मालकांच्या नावाबरोबरच आधार क्रमांक नोंदविण्यासाठीची संगणक प्रणाली विकसित केली जात आहे. हे काम अंतिम टप्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधार क्रमांक टाकल्याबरोबर संबंधित मालकाच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यातील एका तालुक्‍यात प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबविण्याचा निर्णय जमाबंदी आयुक्तांनी घेतला आहे.

संगणक प्रणाली विकसित
पॅन कार्ड, बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, गॅस कनेक्‍शन आदींसाठी आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर आता सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदविला जाणार आहे. 

मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय सूचना केंद्र (एनआयसी) मार्फत संगणक प्रणाली विकसित केली जात असून, तिचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठीची संगणक प्रणाली विकसित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती ‘भूमी अभिलेख’च्या सूत्रांनी दिली.

पॅन कार्डच्या धर्तीवर आधार
केंद्र सरकारने सर्व व्यवहारांना पॅन कार्ड असणे बंधनकारक केले आहे. संबंधित व्यक्तीचा पॅनकार्ड क्रमांक संगणक प्रणालीमध्ये टाकला की त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती लगेचच मिळते. त्याचधर्तीवर पुढील काळात एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला, की त्या व्यक्तीच्या जागा राज्यात कुठे-कुठे आहेत. जागेचे क्षेत्र किती याची माहिती मिळू शकेल.

फसवणुकीला आळा
राज्यात सुमारे २ कोटी ४७ लाखांपेक्षा अधिक सातबारा उतारे आहेत. बनावट सातबारा उतारा अथवा जमीनमालकांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती उभी करून जमिनीची खरेदी-विक्री करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातून वाद निर्माण होत असून, दाव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यास आळा बसावा, जमीनमालकांची तसेच खरेदीदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी उताऱ्यावर आधार कार्ड क्रमांक टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काळजी घेणे आवश्‍यक
दस्त नोंदणी कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टिम पूर्वीपासूनच आहे. सातबारावर आधार क्रमांक दिल्यास दस्त नोंदणीच्या वेळी नोंदणी निरीक्षकांना मालकी हक्काची खात्री करून घेणे सोयीचे होणार आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अनेक नावे असतात. तसेच, गावातील अनेक नावे एकसारखी असू शकतात. त्यामुळे हा प्रयोग राबविताना अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे. नाव आणि आधार क्रमांक यात कोणतीही चूक राहणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.

Web Title: pune news aadhar card for 7/12 utara