मशिन मिळेना, रांग संपेना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी अजून काही दिवस तरी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. कारण, आधार नोंदणी मशिनची संख्या वाढविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना एकीकडे यश मिळत नाही, तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून पुण्यात येणारी ३९ पैकी १४ मशिन बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुणे - तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी अजून काही दिवस तरी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. कारण, आधार नोंदणी मशिनची संख्या वाढविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना एकीकडे यश मिळत नाही, तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून पुण्यात येणारी ३९ पैकी १४ मशिन बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. 

आधार कार्डची नोंदणी आणि त्यातील दुरुस्तीसाठी आधार नोंदणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया’कडे (यूआयडीएआय) शंभर आधार मशिन मिळावीत, असा प्रस्ताव या पूर्वी पाठविला आहे. याची तीन स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत. मात्र अद्यापही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. 

शहरातील आधार नोंदणी केंद्रांवरील वाढत्या रांगांमुळे जळगाव जिल्ह्यातून ३९ आधार नोंदणी मशिन मागविण्यात आल्या आहेत. त्यापैकी १४ मशिन नादुरुस्त आहेत. त्यामुळे जेमतेम २५ मशिन पुण्याला मिळणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

आधार नोंदणी मशिन दुरुस्तीचा खर्च मोठा
आधारची नादुरुस्त मशिन दुरुस्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने ‘यूआयडीएआय’कडे पाठविला होता. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या मशिनची दुरुस्ती करण्याचेही यात नमूद केले होते. मात्र या दुरुस्तीच्या खर्चापेक्षा नवीन आधार नोंदणी मशिन खरेदी करणे योग्य ठरेल, असे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे शंभर नवीन मशिन मिळाव्यात, असा प्रस्ताव देण्यात आला. मात्र याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. 

जळगावहून पुण्यात आधार नोंदणी मशिन
आधार केंद्रांची वाढती गरज लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील ३९ आधार मशिन पुण्यात आणण्यात येणार आहेत. या मशिन महाऑनलाइन या सरकारी कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काळ्या यादीत टाकलेल्या यंत्रचालकांकडून या मशिन जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र ३९ पैकी २५ मशिन कार्यान्वित आहेत. या मशिन मंगळवारी पुण्यात आणल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

बॅंकांच्या ७० शाखांमध्ये आधार सुरू
शहर आणि जिल्ह्यातील बॅंकांमध्ये १३९ आधार केंद्र सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला असला, तरी अद्याप फक्त ७० बॅंकांच्या शाखांमधून नोंदणी केंद्रे सुरू झाली आहेत.

Web Title: pune news aadhar card registration