‘आधार’मधील दुरुस्ती महागली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

आधार कार्डातील दुरुस्तीचे काम खासगी ऑपरेटरांना देण्यात आले आहे. ते सेवा देत असल्यामुळे त्यावर जीएसटी आकारावा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना जीएसटी भरावा लागणार आहे; मात्र नव्याने आधार नोंदणी पूर्णतः निःशुल्क आहे.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी

पुणे - आधार कार्डातील दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून आता जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आधार कार्डातील दुरुस्ती महाग झाली आहे. आधारकार्डातील दुरुस्तीसाठी यापूर्वी २५ रुपये मोजावे लागत होते. त्यावर आता अधिकचा ५ रुपये जीएसटी द्यावा लागणार आहे. वास्तविक आधार नोंदणी करण्याचे काम देण्यात आलेल्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून या चुका झाल्या असताना त्याचा भुर्दंड मात्र नागरिकांनाच भरावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार यापूर्वी राज्य सरकारकडून खासगी कंपन्यांना आधार नोंदणीचे काम देण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरात आतापर्यंत ९० टक्के आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ही नोंदणी करताना नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. या चुका प्रामुख्याने ज्या कंपनीकडून हे नोंदणीचे काम करण्यात आले, त्या कंपनीने पूर्ण प्रशिक्षित कर्मचारी न नेमल्यामुळे झाल्याचे लक्षात आले आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कामांसाठी आधार क्रमांक मागितला जात आहे. एवढेच नव्हे, तर प्राप्तिकर भरण्यासाठीदेखील आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. परंतु आधार कार्डातील चुकांमुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान आधार नोंदणीचे काम आता ‘महाऑनलाइन’ या संस्थेला देण्यात आले आहे. मात्र महाऑनलाइनच्या केंद्रांची संख्या अपुरी असल्यामुळे आणि सरकारी कार्यालयांमध्येदेखील आधार दुरुस्ती मशिन उपलब्ध होऊ न शकल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

 

Web Title: pune news aadhar card repairing