बालेवाडी गावावर शोककळा

बालेवाडी गावावर शोककळा

पुणे/औंध - बालेवाडी येथील केदारी कुटुंबीयांच्या अपघाताचे वृत्त शुक्रवारी रात्री धडकले आणि संपूर्ण बालेवाडी गावासह परिसरात शोककळा पसरली. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे हे कुटूंब आज आपल्यांत नसल्याच्या भावनेने गावातील प्रत्येकजण हळहळत होता. सामूहिक अंत्यसंस्कारावेळी मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश हे दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारे होते.

अपघाताचे वृत्त कळताच बालेवाडी परिसरात सकाळपासूनच केदारी कुटुंबीयांच्या घराकडे नातेवाईक, मित्र, स्वकियांची रीघ लागली होती. बालेवाडी येथील जावई आणि मूळचे कुसगाव येथील भरत केदारी यांना दोन मुले. दिलीप मोठा असून, सचिन हा त्याच्यापेक्षा लहान. छाया नांगरे आणि मनीषा वरखडे या दोन विवाहित मुली. सचिन यांना आठ वर्षांची संस्कृती ही मुलगी होती. तिच्या पाठीवर मूल होत नव्हते, त्यामुळे केदारी कुटुंबीयांनी गणपतीपुळे येथील मंदिरात नवस बोलला होता. नवसामुळे सात वर्षांनंतर मुलगा झाल्याच्या श्रद्धेपोटी नवस फेडायचे ठरले. सचिन हा स्वतःच चालक असून, तो सहसा कोणाच्या गाडीत जात नसे. परंतु दोन्ही बहिणींच्या कुटुंबांसह जायचे म्हणून त्यांनी एक खासगी सतरा आसनी बस भाडेतत्त्वावर ठरवली. सगळे एकत्र गणपतीपुळेला गेले. तेथील पूजा आटोपून पुण्याकडे निघाले असता, काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेमुळे बालेवाडी परिसरात शोककळा पसरली होती. या भागातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. बालेवाडीकर केदारी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून आले.  

वरखडे, केदारी, नांगरे कुटुंबीयांवर अाघात
मृतांपैकी वरखडे कुटुंबीय पौड तालुक्‍यातील पिरंगुट येथे राहत होते. संतोष वरखडे, त्यांच्या दोन मुली गौरी आणि ज्ञानेश्‍वरी यांचा अपघातात मृत्यू झाला. बालेवाडी येथील सचिन केदारी, त्यांची पत्नी नीलम, मुलगी संस्कृती आणि मुलगा सान्निध्य, तसेच सचिन यांची वहिनी भावना दिलीप केदारी, पुतण्या साहिल दिलीप केदारी, पुतणी श्रावणी दिलीप केदारी हे एकत्रित राहत होते. तर, त्यांची बहीण छाया दिनेश नांगरे, भाचा प्रतीक दिनेश नांगरे हे बालेवाडी येथेच राहत होते. बसचालक महेश कुचेकर (वय २८, रा. हिंजवडी) येथील रहिवासी आहेत. मृत सचिन केदारी यांची बहीण मनीषा संतोष वरखडे यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर भाची प्राजक्ता दिनेश नांगरे आणि आई मंदा भरत केदारी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. 

नवस फेडून परतत असताना अपघात
केदारी कुटुंबीय दरवर्षी गणपतीपुळ्याला दर्शनासाठी जात असत. त्यांनी गणपतीपुळे येथे मुलासाठी नवस बोलला होता. त्यांना सात वर्षांनंतर मुलगा झाल्यामुळे ते नवस फेडण्यासाठी दोन्ही बहिणींच्या कुटुंबांसह मिनीबसने गणपतीपुळे येथे गेले होते. नवस फेडून ते रात्री कोल्हापूरमार्गे पुण्याकडे परत येत असताना हा अपघात झाला. अपघातात बालेवाडी पंचक्रोशीतील एखाद्या कुटुंबातील तेरा जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज  
पंचगंगेच्या शिवाजी पुलावरून ही बस येताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. बस अचानक विरुद्ध दिशेला फिरली. त्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकून थेट नदीत कोसळली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. त्यात बसला कोठेही दुसऱ्या वाहनाचा अडथळा आल्याचे दिसून येत नाही. 

हा अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुर्घटनेमुळे बालेवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिकांना धक्का बसला आहे. आम्ही सर्व बालेवाडीकर केदारी, वरखडे व नांगरे परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.
- अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेवक

सचिन केदारी हा माझा जिवलग मित्र होता. तो स्वतः चांगला चालक असल्यामुळे तो कधी कुणाच्या गाडीत जात नव्हता. परंतु तीन कुटुंबीय असल्यामुळे तो खासगी बसने गेला होता. सचिन आमच्यात नाही, यावर आमचा अजूनही विश्‍वास बसत नाही. चांगला मित्र गमावल्याची खंत कायम मनात सलत राहील. 
- जयराम बेळे 

साहिल, प्रतीक दोघेही हुशार विद्यार्थी 
साहिल केदारी आणि प्रतीक नांगरे हे दोघेही बालेवाडी येथील खंडेराय शिक्षण संस्थेच्या म्हा. तु. बालवडकर शाळेचे विद्यार्थी होते. सचिन केदारी यांच्या मोठ्या भावाचा मुलगा साहिल तर बहीण छाया नांगरे यांचा प्रतीक हा मुलगा आहे. ते दोघे चांगले मित्र होते, असे प्रतीकचे वर्गशिक्षक शिक्षक पांडूरंग भुजबळ यांनी सांगितले. प्रतीक हा दहावीच्या वर्गात शिकत होता. तर, साहिल हा याच शाळेत नववीत शिकत होता. साहिल हा मितभाषी आणि अभ्यासात हुशार. तर, प्रतीक हा चित्रकार आणि कबड्डीचा चांगला खेळाडू होता. येत्या एप्रिलमध्ये प्रतीकचा वाढदिवस होता. तो बाणेर येथील तुकाई टेकडीवर वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा करणार होता. शाळेच्या वृक्षारोपण समारंभातही त्याने हिरिरीने भाग घेतला होता. चांगले गुणवान विद्यार्थी आणि खेळाडू शाळेने गमावल्याचे दुःख संस्थेचे सचिव सागर बालवडकर यांनी व्यक्त केले.  

विद्यार्थी, शिक्षिका गहिवरल्या
अपघातामधील छाया दिनेश नांगरे या सचिन केदारी यांच्या मोठ्या भगिनी आहेत. त्या डोअर स्टेप नावाच्या स्वयंसेवी संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. बाणेर, बालेवाडी परिसरातील ज्या मुलांना शाळेत जाणे शक्‍य नाही, अशा मुलांना त्या शिकवित होत्या. मनमिळाऊ आणि कार्यतत्पर असलेल्या शिक्षिका असा त्यांचा लौकिक होता. शिक्षणापासून वंचित मुलांना आपुलकीने शिकवून उभे करणाऱ्या छायाताईंच्या मृत्यूच्या घटनेने विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षिकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com