दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला तर कारवाई

संदीप जगदाळे
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

राज्यातील विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेवून त्यांना वापरता येतील अशी अधुनिक शैक्षणिक साधने शासनातर्फे मोफत वाटप करण्यात येणार आहेत.

हडपसर : पुणे अंध शाळेचे दृष्टिहीन विदयार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसनाचे कार्य कौतुकास्पद आहे. दिव्यांग विदयार्थ्यांना स्वावलंबी व स्वाभीमानी जीवन जगण्यासाठी सुरू असलेले या शाळेचे कार्य समाजातील अन्य संस्थांनी प्रेरणादायी आहे, असे मत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई च्या सचिव सुवर्णा खरात यांनी व्यक्त केले.

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेला भेट देऊन दृष्टीहीन विदयार्थ्यांची शिक्षण पध्दती आणि शैक्षणिक साधनांची माहिती घेण्यासाठी त्यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली, याप्रसंगी खरात बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे राज्य समन्वयक विलास कदम, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी हरिदास डोंगरे, पुणे अंधशाळेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील थोरात उपस्थित होते. 

खरात पुढे म्हणाल्या, निवासी शाळेबरोबरच सर्वसामान्य शाळांमध्ये दिव्यांग मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासन यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दिव्यांग विदयार्थ्यांची सामाजिकरणाची प्रकीया चांगली होत आहे. राज्यातील विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेवून त्यांना वापरता येतील अशी अधुनिक शैक्षणिक साधने शासनातर्फे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. तसेच सामान्य शाळेतील शिक्षकांना विशेष मुलांना शिकविण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. शैक्षणिक धोरणानुसार कोणत्याही सामान्य शाळेला दिव्यांग विदयार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही. दिव्यांग विदयार्थ्यांना प्रवेश नाकारणा-या शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news action against denying admission to special children