रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

बेकायदा हातगाड्या, स्टॉल्स काढले

पुणे - रस्त्यावर, म्हणजे उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, वेगवेगळ्या भागांतील सुमारे पावणेदोनशे व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावरील बेकायदा हातगाड्या आणि स्टॉलही काढण्यात आले. पुढील पंधरा दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. 

शहरात कुठे उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जाऊ नयेत, याकरिता क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर कारवाईचे नियोजन केले आहे. अशा व्यावसायिकांना दंड करण्याची सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली आहे. त्याचा आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सांगण्यात आले. 

शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करण्यास बंदी आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत, सर्रास कोणतीही काळजी न घेता, हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, कारवाई झाली नव्हती. ‘सकाळ’ने विविध भागांतील रस्त्यांवरील खाद्यपदार्थ व्रिकेत्यांची पाहणी करून, नेमकी वस्तुस्थिती मांडली होती. त्यानुसार अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 

पहिल्या टप्प्यात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता आणि शास्त्री रस्त्यावरील व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्यात, विशेषतः हातगाडी आणि स्टॉलधारकांचा समावेश आहे. विविध पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांनी सांगितले. गागरे म्हणाल्या, ‘‘ज्या भागात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत, त्याची पाहणी करून त्यावर लगेचच कारवाई करण्यात येत आहे. त्याकरिता, आवश्‍यक तेवढे कर्मचारी नेमण्यात आले असून, ही कारवाई नियमित सुरू राहील.’’

Web Title: pune news Action on street food sellers