esakal | Pune: पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ व्हावी : आदित्य ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरे

पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ व्हावी : आदित्य ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (ता.२९) पुण्यात एका बैठकीत बोलताना व्यक्त केली. यासाठी खासगी उद्योग, कंपन्या, सामाजिक संस्था आणि पर्यावरण तज्ज्ञ आणि नागरिकांचे सहकार्य घ्या, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

पुणे विभागातील ‘कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियान दोनची त्यांनी बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, वसुंधरा अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे, उपायुक्त प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: तळई गावातील घरांची उभारणी दिवाळीपूर्वी अशक्य

शहरात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक आहे. ऊर्जेचा अधिक वापरदेखील ग्रामीण भागापेक्षा शहरात जास्त होतो. त्यामुळे पर्यावरणात वेगाने बदल घडत असून दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षणाचे दीर्घकालीन नियोजन आणि ठोस कृती अपेक्षित आहे. शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनुकूल बदल केले पाहिजेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

ठाकरे म्हणाले, ‘‘नागरिकांमध्ये सौर ऊर्जेचा वापर, हरित क्षेत्र वाढविणे, जल पुनर्भरण, विघटनशील कचऱ्याचा पुनर्वापर आदी उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण करावी. शाळा-महाविद्यालयातून अपारंपरिक ऊर्जेच्या वापराबाबत माहिती देण्यात यावी. शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संयंत्र बसवावे. स्वच्छतेवर भर, दैनंदिन सवयींमध्ये करून ऊर्जेची बचत आदी उपाययोजनांच्या माध्यमातून मोठा बदल घडवून आणता येईल.’’

माझी वसुंधरा अभियानात पुणे विभागातील ४३० स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. बैठकीनंतर विभागीय आयुक्त परिसरात ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

‘सिंहगड किल्ल्यावर ई-बससेवा’

पुणे शहर व जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी आणि जल व हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मुळा-मुठाच्या संगमावर जलपर्णीमुक्तीचे अभियान आणि सिंहगड किल्ल्यावर ई-बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत बोलताना सांगितले.

loading image
go to top