सायबर कॅफेत अर्ज भरण्यास मनाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

पुणे - अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून (ता. २५) सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका, लॉग इन आणि पासवर्ड त्यांच्याच शाळेत उपलब्ध होईल. अर्ज भरण्यासाठी उद्या दुपारी एकनंतर ‘लिंक’ खुली होणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशाचा अर्ज त्यांची शाळा भरून देणार आहे. त्यामुळे सायबर कॅफे वा अन्य कोणत्याही ठिकाणी अर्ज भरता येणार नाही.  

पुणे - अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून (ता. २५) सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका, लॉग इन आणि पासवर्ड त्यांच्याच शाळेत उपलब्ध होईल. अर्ज भरण्यासाठी उद्या दुपारी एकनंतर ‘लिंक’ खुली होणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशाचा अर्ज त्यांची शाळा भरून देणार आहे. त्यामुळे सायबर कॅफे वा अन्य कोणत्याही ठिकाणी अर्ज भरता येणार नाही.  

अकरावीमध्ये व्यवस्थापन, संस्थांतर्गत, अल्पसंख्याक अशा कोणत्याही कोट्यातून प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्याने ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज भरणे बंधनकारक आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड वगळता इतर गावांहून किंवा राज्यातून पुण्यात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसाठी वेगळी मदत केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लॉग इन आयडी, पासवर्ड मिळेल. तिथेच त्यांचा ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येईल. तेथे असलेले अधिकारी वा शिक्षक विद्यार्थ्यांचा अर्ज मान्य (अप्रूव्ह) करून देतील.

प्रवेशाच्या अर्जाच्या पहिल्या भागात विद्यार्थ्याची वैयक्तिक आणि आरक्षणासंबंधी माहिती भरायची आहे. त्यानंतर तो अर्ज मान्य करून घ्यायचा आहे. ही प्रक्रिया या वेळी सुलभ करण्यात आली आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्याने त्याच्या शाळेत अर्ज भरल्यानंतर किंवा शाळेकडून भरून घेतल्यानंतर त्या शाळेचे मुख्याध्यापक अर्जातील सर्व बाबींची शहानिशा करून त्यांचे स्वतःचे लॉग इन वापरून तो अर्ज मान्य (अप्रूव्ह) करतील. त्यानंतरच विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येईल.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून अर्जाचा भाग एक भरता येईल. अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. राज्य बोर्डाचे विद्यार्थी पण अन्य जिल्ह्यातून पुण्यात अकरावी प्रवेशासाठी येणार असतील, तर त्यांना एकाच ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा व मार्गदर्शन मिळावे, यासाठी केंद्र तयार करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्याची दहावीची माध्यमिक शाळा अकरावीचा प्रवेश अर्ज मोफत भरून देणार आहे. त्यामुळे कुणालाही सायबर कॅफे वा अन्य ठिकाणी प्रवेश अर्ज भरता येणार नाही. या ठिकाणी अर्ज भरला आणि आरक्षणाची माहिती चुकल्यास विद्यार्थी लाभापासून वंचित राहू शकतो, असा प्रकार उद्‌भवल्यास होणाऱ्या नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील.
- दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक

अकरावीचा प्रवेश अर्ज भरताना
अर्ज भरण्यासाठी माहिती पुस्तिका आणि त्याबरोबर लॉग इन आयडी-पासवर्ड घेणे आवश्‍यक.
अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. त्यातील नमुना अर्ज आधी भरा.
पहिल्यांदा ‘लॉग इन’ करण्यासाठी माहिती पुस्तिकेतील ‘लॉग इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ वापरा.
नंतर पासवर्ड बदला. तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड द्या. 
सिक्‍युरिटी प्रश्‍न आणि पासवर्ड याची प्रिंट घेऊन ती स्वत:कडे ठेवा. पासवर्ड विसरला, तर त्याचा उपयोग होईल.
पासवर्ड बदलल्यानंतर पुन्हा नव्याने लॉग इन करून संगणकावर दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्ज भरा.
अर्जातील भाग एक भरताना राज्य शिक्षण मंडळाच्या नियमित विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा बैठक क्रमांक टाकल्यानंतर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप भरली जाणार आहे.
अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र त्यांची वैयक्तिक माहिती त्यांना स्वत:ला भरावी लागणार आहे.

Web Title: pune news admission form submit oppose in cyber cafe