फसवणूकप्रकणी वकिलाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पुणे - बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात दावे दाखल करीत फसवणूक केल्याच्या आरोपाखाली खंडणीविरोधी पथकाने एका वकिलाला अटक केली. आरोपीने बनावट हक्कसोड पत्र, जमिनीच्या मूळ मालकाची बनावट सही केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

पुणे - बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात दावे दाखल करीत फसवणूक केल्याच्या आरोपाखाली खंडणीविरोधी पथकाने एका वकिलाला अटक केली. आरोपीने बनावट हक्कसोड पत्र, जमिनीच्या मूळ मालकाची बनावट सही केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

राजेश खैरातीलाल बजाज ऊर्फ राजेश राज सचदेवा (वय 55 , रा. कमला नेहरू पार्क, एरंडवणे) असे वकिलाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध आदित्य जयंत दाढे (रा. औंध) यांनी फिर्यादी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाढे यांनी कोथरूड येथील जमीन मूळ मालकाकडून कुलमुखत्यारपत्राने घेतली होती. ती स्वमालकीची असल्याचा दावा करीत बजाजने महापालिका न्यायालय आणि शिवाजीनगर न्यायालयात खोटे दावे केले होते. आरोपी हा स्वत: वकील असल्याचे सांगत असून, त्याला उच्च न्यायालयाने वकिली करण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस आणि खंडणीविरोधी पथकाने तपास केला. त्यामध्ये आरोपीने फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. 

आरोपीने दिवाणी दाव्यात दाखल केलेले 1988 च्या मूळ मालकाच्या हक्कसोड पत्रातील वादग्रस्त पत्रावरील रेव्हेन्यू स्टॅम्प हा 2003 मध्ये छापण्यात आला आहे, या पत्रावरील सही बनावट असल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे, आरोपी हा जन्माने राजेश राज सचदेवा असून, खैरतलाल बजाज यांनी दत्तक पुत्र करून घेतले आहे, असा तो दावा करीत आहे. आरोपी हा दत्तक पुत्र नसल्याची आणि हक्कसोड पत्र खैरतलाल बजाज यांनी करून दिले नसल्याची माहिती तपासात पुढे आली. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलिसांनी बजाजविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली, अशी माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली. सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार अधिक तपास करत आहेत. 

आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची 17 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. आरोपीने हक्कसोड पत्र कोठे तयार केले, रेव्हेन्यू स्टॅम्प कोठून घेतला, आरोपीचा दत्तक विधी कधी झाला, आरोपीने खैरातीलाल बजाज आणि विद्यावती बजाज यांचे मृत्युपत्र कोठे तयार केले, अशा मुद्यांच्या तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.

Web Title: pune news advocate