वकिलांच्या "बार रूम'मध्ये अनधिकृत कोनशिला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - नुकतेच उद्‌घाटन झालेल्या कौटुंबिक न्यायालयातील वकिलांच्या बार रूममध्ये अनधिकृत "कोनशिला' बसविण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यामुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न काही दिवसांतच पुढे आला आहे. 

शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीच्या उद्‌घाटनानिमित्त पुणे बार असोसिएशन आणि फॅमिली कोर्ट बार असोसिएशन यांच्यात मानापमान नाट्य रंगले होते. हे नाट्य संपले, असे वाटत असतानाच वादाचा नवीन मुद्दा समोर आला आहे. या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर वकिलांचा बार रूम आहे. त्यात कोनशिला बसविण्यात आली. ही कोनशिला बसविण्यासाठी भिंत फोडली गेली. न्यायालय प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ती काढण्यात आली. यामुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा समोर आला आहे. या कोनशिलेवर पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि उद्‌घाटनास उपस्थित असलेल्या मान्यवरांची नावे होती. 

या प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाच्या सुरक्षारक्षकांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. शनिवार सांयकाळी ही कोनशिला बसविली गेली. सोमवारी हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा नोंदविला गेला. कोणतीही परवानगी न घेता ही कोनशिला बसविण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. दोन कारागीर आणि पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Web Title: pune news advocate family court