"शेतीमाल तारण कर्ज' योजनेची काटेकोर अंमलबजावणी करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे  - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शेतकरी आणि सरकारमधील दुवा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी काम केले पाहिजे. आत्महत्या रोखण्यासाठी "शेतीमाल तारण कर्ज' योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केले. 

पुणे  - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शेतकरी आणि सरकारमधील दुवा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी काम केले पाहिजे. आत्महत्या रोखण्यासाठी "शेतीमाल तारण कर्ज' योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केले. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वतीने कृषी बाजार समित्यांची एकदिवसीय कार्यशाळा आणि शेतीमाल तारण कर्ज वितरित केलेल्या कृषी बाजार समित्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याचे पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक एम. एल. लोखंडे, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते आदी उपस्थित होते. 

या वेळी गतवर्षीच्या शेतीमाल तारण कर्ज वितरित केलेल्या कृषी बाजार समित्या तसेच विभागीय कार्यालयांना पुरस्कार देण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

देशमुख म्हणाले, ""राज्यातील शेतकऱ्याला बॅंका आणि समित्यांकडून कर्ज मिळत नसल्याने व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागते. बेभरवशाचा पाऊस, गारपीट यांसह उत्पन्न जादा निघूनही शेतीमालाला हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो. त्यामुळे सर्व 306 बाजार समित्यांनी "शेतीमाल कर्ज तारण'योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. साठेबाजांना पाठीशी न घालता शेतकऱ्यांना अभय द्यावे. राज्य सरकार लागेल त्या सोयीसुविधा आणि मदत करण्यास तयार आहे,'' असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

"पक्षीय मतभेद दूर ठेवून शेतकऱ्यांसाठी एकत्र या' 
केंद्र आणि राज्यात आमचे सरकार आणि कृषी बाजार समित्या विरोधी पक्षांच्या असल्याने या समित्या मोडीत काढल्या जात असल्याचा अपप्रचार केला जात आहे. निवडणुकांमध्ये आपण पक्षाच्या बाजूने एकमेकांच्या विरोधात लढू, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी "राजकीय जोडे बाहेर काढून, पक्षीय मतभेद विसरून एकत्र काम करूयात,' अशी विनंतीदेखील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या वेळी केली. 

Web Title: pune news agriculture subhash deshmukh