नियोजित विमानतळाच्या जागेत बदल नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - पुरंदर येथील नियोजित विमानतळासंदर्भात उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्द्यांच्या संदर्भातील खुलासा करणारा अहवाल एअरपोर्ट ॲथॉरिटीने तयार करून संरक्षण मंत्रालयाकडे सादर केला आहे. आता मंत्रालयाकडून मान्यता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एअरपोर्ट ॲथॉरिटीने सादर केलेल्या अहवालात विमानतळाच्या जागेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर येथील जागा निश्‍चित केली आहे. या जागेसंदर्भात संरक्षण राज्यमंत्र्यांबरोबर दोन वेळा बैठकही झाली. या बैठकीत हवाई दलाने विमानतळाच्या जागेबाबत काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते. त्यासंदर्भातील खुलासा चार आठवड्यांच्या आत सादर करण्याची सूचना राज्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार तांत्रिक मुद्द्यांचे विश्‍लेषण करण्यासाठी एअरपोर्ट ॲथॉरिटीला पुन्हा सर्व्हेक्षण करावे लागणार होते. ते काम नुकतेच पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. एअरपोर्ट ॲथॉरिटीने सादर केलेल्या या खुलाशावर चर्चा होऊन मान्यता मिळेल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

दरम्यान, विमानतळासाठी निश्‍चित केलेल्या जागेचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून एमआयडीसीला देण्यात आले आहे. हवाई दलाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादनाची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे; मात्र संरक्षणमंत्र्यांकडून ही बैठक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वंकष प्रकल्प अहवाल लवकरच
दरम्यान, सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम एमआयडीसीकडून जर्मन येथील डार्स कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून हे काम लवकरच पूर्ण होईल. विमानतळासाठीचे केंद्र सरकारने केलेले निकष लक्षात घेऊन भूसंपादनाचे क्षेत्र निश्‍चित करण्याबरोबरच टर्मिनल, धावपट्टी आदी गोष्टींचे आराखडे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी या कंपनीला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांबरोबरची बैठक लवकर होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास विमानतळासाठीच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: pune news airport