विमानतळावर पार्किंग शुल्क कमी करण्याचा निर्णय कागदावरच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पुणे - लोहगाव विमानतळ येथील पार्किंगचे शुल्क कमी करण्याबाबत विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व खासदार अनिल शिरोळे यांनी केलेली घोषणा कागदावरच राहिली आहे. पूर्वीप्रमाणेच विमानतळ प्रशासनाने दुचाकीसाठी 20 रुपये आणि चारचाकीसाठी 85 रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. 

विमानतळाच्या आवारात प्रवेश केल्यापासून बाहेर जाण्यासाठी सात मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास अशा वाहनांकडून पार्किंगचे शुल्क आकारले जात होते. या प्रकाराला अनेकांनी विरोध केला, तर शिवसेनेने आंदोलनही केले होते. भरमसाट शुल्क आकरूनही पार्किंगची सुविधा विमानतळापासून दूर आणि दर्जेदार नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होऊन हे पार्किंग शुल्क 80 रुपयांवरून कमी करून 30 मिनिटांसाठी 30 रुपये व एका तासासाठी पन्नास रुपये करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अनिल शिरोळे यांनी दिली होती. 

प्रत्यक्षात मात्र विमानतळ प्राधिकरणाने पार्किंग शुल्क पुन्हा वाढविले असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. यापूर्वी दुचाकीकरिता 20 रुपये, चारचाकीसाठी 85 रुपये आणि "एसयूव्ही' वाहनांसाठी 100 रुपये, असे दोन तासांसाठी हे शुल्क आकारले जात आहे. विमानतळ प्रशासनाने पुनर्निविदा प्रक्रिया राबवून पार्किंगसाठी नवीन कंत्राटदार नेमला आहे; परंतु पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारणी सुरू झाली आहे.

Web Title: pune news airport parking