मुळशी धरणातील पाण्यासाठी टाटा कंपनीला वाकवणार: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

'अन् राहुल कुलची लॅाटरी लागली' 
यावेळी श्री पवार म्हणाले, पारगाव भारी गाव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीला या गावातून प्रमुख राजकीय पक्षांचे तीन उमेदवार रिंगणात होते. हे तीघेही आडवे झाले आणि रमेश थोरात यांनाही आडवे केले. या घोळात राहुल कुल यांची लॅाटरी लागली.  

केडगाव : पुणे शहर दिवसेंदिवस वाढत असल्याने पिण्यासाठी व शेतीसाठी दिवसेंदिवस पाणी कमी पडणार आहे. मुळशीतील टाटा धरणाचे पाच टिएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी मिळाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. हे धरण वीज निर्मितीसाठी असले तरी वीजेसाठी आता अनेक पर्याय आहेत. आमची सत्ता आल्यानंतर हा निर्णय तातडीने घेतला जाईल. त्यासाठी तुमची ( मतदारांची ) साथ पाहिजे. पिण्याच्या पाण्यासाठी सहकार्य न केल्यास आम्ही टाटा कंपनीला वाकवणार आहोत. असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

पारगाव ( ता. दौंड ) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या शताब्दी समारंभात श्री. पवार बोलत होते. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, दौंड पंचायत समितीच्या सभापती मीना धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, उद्योजक विकास ताकवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, तालुकाध्यक्ष विकास खळदकर उपस्थित होते. 

राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी आहे की फसवी योजना आहे. संपुर्ण कर्ज भरल्यानंतरच दिड लाखाची कर्ज माफी मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीची योजना आहे का कर्जवसुलीची हे कळत नाही. शेतक-यांकडे पैसे असते तर त्यांनी अगोदर भरले नसते का. चुकीच्या माणसाला कर्जमाफी मिळाली नाही पाहिजे. या सरकारच्या धोरणाला आमची सहमती आहे. पुनर्गठऩ केलेल्या शेतक-यांना कर्जमाफी दिली पाहिजे. 

माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, पारगाव सोसायटीच्या कामकाजासाठी संस्थेचे सर्व संचालक कौतुकास पात्र आहेत. जिल्हा बँक ही शेतक-यांची बँक असून या बँकेला 70 कोटींचा नफा झाला आहे. सहकारात शिस्त नसेल तर संस्था डबघाईला येतात. आणि त्यातून सभासदांचे नुकसान होते.  संस्थेचे ज्येष्ठ संचालक सयाजी ताकवणे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश ताकवणे यांनी स्वागत केले. 

'अन् राहुल कुलची लॅाटरी लागली' 
यावेळी श्री पवार म्हणाले, पारगाव भारी गाव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीला या गावातून प्रमुख राजकीय पक्षांचे तीन उमेदवार रिंगणात होते. हे तीघेही आडवे झाले आणि रमेश थोरात यांनाही आडवे केले. या घोळात राहुल कुल यांची लॅाटरी लागली.  

Web Title: Pune news Ajit Pawar demands Mulshi dam water for Pune