अजितदादांचा लागणार कस

संभाजी पाटील
शनिवार, 31 मार्च 2018

पक्षाला नवे नेतृत्व मिळणार ही खरे तर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये बदलाचे वातावरण निर्माण करणारी चैतन्यदायी बाब असते. राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात नवा शहराध्यक्ष मिळणार अशा अनेकदा घोषणा झाल्या; पण अनेक कारणांमुळे हा बदल करणे पक्षनेतृत्वाला योग्य वाटले नसावे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शहराध्यक्ष बदलणार आणि तरुण चेहऱ्याला संधी देणार, असे जाहीर केले. त्यामुळे साहजिकच इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने कदाचित या वेळी बदल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पक्षाला नवे नेतृत्व मिळणार ही खरे तर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये बदलाचे वातावरण निर्माण करणारी चैतन्यदायी बाब असते. राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात नवा शहराध्यक्ष मिळणार अशा अनेकदा घोषणा झाल्या; पण अनेक कारणांमुळे हा बदल करणे पक्षनेतृत्वाला योग्य वाटले नसावे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शहराध्यक्ष बदलणार आणि तरुण चेहऱ्याला संधी देणार, असे जाहीर केले. त्यामुळे साहजिकच इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने कदाचित या वेळी बदल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

खासदार वंदना चव्हाण यांनी गेली आठ वर्षे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. नुकतीच त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाल्याने आणि त्यांनी शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केल्याने राष्ट्रवादीला नवा शहराध्यक्ष मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

चव्हाण शहराध्यक्ष झाल्या तेव्हा महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. पक्षातील सर्व गटतटांना सोबत घेऊन जाणाऱ्या आणि पुणेकरांना आपलासा वाटेल, असा सुशिक्षित चेहरा म्हणून पक्षनेत्यांनी चव्हाण यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपवली होती. त्यांची निवड पक्षातील जुन्या नेत्यांना खटकलीही, तरीही पक्षात शिस्त आणण्यासाठी चव्हाण यांनी अनेक प्रयोग केले, त्यामुळे एका गटाचा त्यांना विरोध कायम राहिला. तरीही एक नवीन टीम उभी करण्यात त्यांना यश आले. 

महापालिका निवडणुकीत किंवा त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फारशी कामगिरी करता आली नाही, त्याची कारणे अनेक आहेत. परंतु या पराभवानंतर पक्षसंघटनेत अनेक बदल होतील, काही त्रुटी राहिल्या, त्या दूर कारण्यासाठी प्रयत्न होतील, असे वाटले होते. तसे झाले नाही, स्वतः अजित पवार यांनीही महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पुण्याकडे काहीसे दुर्लक्षच केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे पक्ष संघटनेतील बदल आणि सत्ता गेल्यानंतर आलेली मरगळ पक्षात कायम राहिली. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधीपक्ष आहे; पण भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादीला तेथेही आपला अद्याप म्हणावा असा प्रभाव पाडता आलेला नाही. खासदार चव्हाण यांचे राज्यसभेतील काम चांगले आहे, त्याकडे लक्ष देऊन पक्षसंघटना सांभाळताना मर्यादा येत असल्याने बदलाची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यास स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मान्यता मिळालेली दिसते.

राष्ट्रवादीची शहरात चांगली ताकद आहे. महापालिकेत दहा वर्षे सत्ता उपभोगल्यामुळे महापौर आणि इतर पदे उपभोगलेले पदाधिकारी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत; पण आतापर्यंत पक्षश्रेष्ठींसमोर जी अडचण आली ती यावेळीही येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ती म्हणजे सर्व सर्वसमावेशक चेहरा. पुण्याचा विस्तार पाहता केवळ एका प्रभागापुरता किंवा विधानसभा मतदारसंघापुरता प्रभाव असणारा चेहरा चालणार नाही. भाजपचा सध्याचा जो विजयी वारू उधळला आहे, त्याला रोखण्याची क्षमता त्या नेतृत्वात असावी, अशी किमान अपेक्षा पक्षाची असणार.

महापालिकेतील अनुभव, कार्यकर्त्यांचे पाठबळ, कॉस्मोपॉलिटन पुण्याला आपला वाटेल असा चेहरा आणि जातीय समीकरणे असे अनेक निकष नव्या शहराध्यक्षाला पार करावे लागणार आहेत. संपूर्ण शहरात चालेल, असे दुसऱ्या फळीतील नेतृत्व पक्षात तयार झाले नाही. आता जी नावे चर्चेत आहेत, ती त्या-त्या भागापुरती मर्यादित आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदाची निवड करताना खरा कस इच्छुकांपेक्षाही पक्षनेत्यांचाच लागणार हे खरे.

Web Title: pune news ajit pawar politics