...तर पेट्रोल सहा रुपयांनी स्वस्त होईल 

संभाजी पाटील
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आता 80 रुपये प्रतिलिटरचा टप्पा गाठला आहे. शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर सर्वाधिक आहेत. जर राज्य सरकारने उत्पन्नवाढीसाठी आकारलेले कर कमी केले, तर पेट्रोल सहा रुपयांनी स्वस्त होऊ शकते. या संदर्भात ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांच्याशी संभाजी पाटील यांनी केलेली बातचीत. 

शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल सर्वांत महाग का आहे? त्याची कारणे काय आहेत? 
महाराष्ट्रात देशात सर्वांत महाग पेट्रोल डिझेल मिळते, याला राज्याकडून लावण्यात आलेले विविध कर हेच एकमेव कारण आहे. तेल कंपन्यांकडून विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या पेट्रोलचा दर (लॅंडेड कॉस्ट) 29 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर हा 19 रुपये प्रतिलिटर आहे. त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून मिळून 48.8 टक्के व्हॅट आणि उत्पादन शुल्क लावले जातो. याशिवाय राज्याकडून पेट्रोलवर 9 टक्के वेगळा सेस आकारला जातो. या नऊ टक्‍क्‍यांमध्ये तीन रुपये दुष्काळी कर, तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन भरून काढण्यासाठी लावलेला कर, एक रुपया शिक्षण, एक रुपया स्वच्छ भारत आणि एक रुपया कृषी कल्याण सेस घेतला जातो. (यातील शिक्षण, स्वच्छ भारत आणि कृषी कल्याणकर हे सध्या तीन वेळा भरत आहोत.) दुष्काळ जाऊन चार वर्षे झाली; तसेच महामार्गावरील दारूबंदीही शिथिल केली, तरीही कर वसूल करून सर्वसामान्यांवर भुर्दंड लादला जात आहे. हे दोन्ही कर तातडीने रद्द करायला हवेत. ते केले तर तत्काळ सहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त होईल. 

शेजारील राज्यांत नेमकी काय स्थिती आहे, त्याचा आपल्या राज्यावर काय परिणाम होत आहे? 
: राज्यात साडेचार हजार पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी दोन हजार पंप हे सीमावर्ती भागात आहेत. आपले कर जास्त असल्याने आपल्या तुलनेत गोव्यात पेट्रोल दहा रुपये, आंध्र प्रदेशात 8 रुपये, कर्नाटकात 6 रुपये आणि मध्य प्रदेशात 5 रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात महाराष्ट्रात पेट्रोल भरले जात नाही, हे सर्व पंप अडचणीत आले आहेत. हा फटका जसा पंपचालकांना बसला आहे, तसा राज्याच्या उत्पन्नालाही बसू लागला आहे. खप कमी झाल्याने तेवढा कर बुडतो आहे, याशिवाय पेट्रोल-डिझेल शेजारील राज्यांतून आणून बेकायदा विकण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. अशी विक्रीही धोकादायक आहे; पण त्याला राज्य सरकारच प्रोत्साहन देत आहे. हे थांबविण्यासाठी "वन नेशन, वन रेट' हा फॉर्म्युला वापरावा, अशी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलचे दर सारखे झाले, तर ही असमानता कमी होईल, पर्यायाने नागरिकांना योग्य दरात पेट्रोल-डिझेल मिळेल. 

पेट्रोल पंपावर "चीप' वापरून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार उघड झाले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी असोसिएशन म्हणून आपण काय उपाययोजना करीत आहात? 
: पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार होत आहेत, ही बाब बरोबर आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. असे गैरप्रकार करणारे पंपचालक तुरुंगात गेले आहेत. त्यांच्यावर पोलिस आणि पेट्रोलियम कंपन्या योग्य ती कारवाई करीत आहेत; पण असे प्रकार घडू नयेत यासाठी आम्ही असोसिएशनच्या पातळीवरही खबरदारी घेत आहोत. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी ग्राहक किती जागृत आहे, हेच अधिक महत्त्वाचे आहे. त्याला जागृत करण्यासाठी आम्ही जनजागृती मोहीम हाती घेत आहोत. 

Web Title: pune news All India Petrol Dealers Association Ali Daruwala interview