अमृतांजन पूल आमचाच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कागदपत्रे दाखवा
पुण्यातील एका नागरिकाने ही जागाच मालकी हक्काची असल्याचा दावा करीत हरकत घेतली आहे. त्यासाठी त्यांनी जागेचा सातबारा उताराही हरकतीसोबत जोडला आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ने संबंधित हरकतदारास पत्र पाठवून मालकी हक्‍क सिद्ध करणारी सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

पुणे - खंडाळा येथील अमृतांजन पूल पाडण्यासंदर्भात हरकती नोंदवत काहींनी पूल आमचाच आहे, असा दावा केला आहे. कोणी म्हणत हा पूल लव्हर व्ह्यू असल्यामुळे तो पाडू नये, तर कोणी पावसाळ्यातील पिकनिक स्पॉट असल्याचे त्याला हात लावू नये, अशा सूचना केल्या आहेत. 

हा पूल १८६ वर्ष जुना असल्याने धोकादायक बनला आहे. त्यामुळे तो पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) घेतला असून, त्यासंदर्भात नागरिकांकडून हरकती-सूचना मागविल्या होत्या. त्याची अंतिम मुदत नुकतीच संपली असून, आतापर्यंत जवळपास २४ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यापैकी केवळ दोन जणांनीच हा पूल पाडण्यासंदर्भात सूचना केली असून, एका हरकतदाराने तर चक्‍क या पुलाची जागा मालकी हक्काची असल्याचा दावा केला.

दाखल झालेल्या हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून लवकरच समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या पुलासंदर्भात पुरातत्त्व विभाग आणि रेल्वे विभागाकडेही विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. दाखल झालेल्या हरकतींमध्ये जवळपास ऐंशी टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांनी हा पूल पाडण्यासंदर्भात विरोध केला आहे. अनेकांनी हा पूल ऐतिहासिक आणि टुरिस्ट स्पॉट असल्याने तो पाडू नये, अशी विनंती करणारी हरकत घेतली आहे. दरम्यान, या पुलाची मोजणी करून मिळावी, असे पत्र ‘एमएसआरडीसी’ने जमाबंदी कार्यालयास दिले आहे. या सर्व प्रकारामुळे नवीन पूल उभारण्याचा बेत लांबणीवर पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेला आणि अलीकडच्या काळात अपघात व वाहतूक कोंडीचे केंद्र बनलेला हा अमृतांजन पूल. या पुलाखाली अवजड वाहने अडकून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यातून सुटका करण्यासाठी आणि या पुलाला समांतर असा दुसरा पूल बांधल्यामुळे सध्या अमृतांजन पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून, तो पाडण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला आहे.

Web Title: pune news amrutanjan pool