अखेर प्रदेश कॉंग्रेसवर अनंत गाडगीळ नियुक्‍त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - आमदार असूनही कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार अनंत गाडगीळ यांची नाट्यमय घडामोडींनंतर प्रदेश कॉंग्रेसवर नियुक्‍ती झाली आहे. 

पुणे - आमदार असूनही कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार अनंत गाडगीळ यांची नाट्यमय घडामोडींनंतर प्रदेश कॉंग्रेसवर नियुक्‍ती झाली आहे. 

शहर कॉंग्रेसने निवडलेल्या 12 नावांमध्ये गाडगीळ यांचे नाव नव्हते. त्यामुळे नाराज होऊन ते आक्रमक झाले होते. मुंबई आणि दिल्लीतील नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला होता. त्याबाबतचे वृत्त "सरकारनामा'वर प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी रात्री गाडगीळ यांच्याशी संपर्क साधून, प्रदेश कॉंग्रेसवर त्यांची विशेष कोट्यातून नियुक्ती झाल्याची माहिती दिली. तत्पूर्वी, कसबा पेठेतून रोहित टिळक यांना संधी दिली जाते आणि मला मात्र हेतूतः डावलले जाते, असे गाडगीळ यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणले होते. दरम्यान, गाडगीळ यांनी भविष्यात शहरात आक्रमकपणे सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. 

पक्षाध्यक्ष ठरविणार शहराध्यक्ष 
राज्यातील शहरांतून सुमारे 450 हून अधिक प्रतिनिधींची प्रदेश कॉंग्रेसवर नियुक्ती झाली आहे. त्यांची बैठक बुधवारी रात्री मुंबईत झाली. त्यात सर्व जिल्ह्यांचे आणि शहरांचे अध्यक्ष ठरविण्याचा अधिकार पक्षाध्यक्षांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. त्यामुळे पुण्याच्या शहराध्यक्षपदाची निवडही कॉंग्रेसचे अध्यक्ष करणार आहेत.

Web Title: pune news Anant Gadgil congress