वाहतूक नियंत्रक दिव्यांची लवकरच देखभाल-दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

पुढील वर्षभरासाठी सिग्नलसंदर्भातील कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. कमीत-कमी दर असलेल्या ठेकेदाराला हे काम देण्याबाबतचा ठराव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून, मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर कामाचा आदेश देऊन लगेचच आवश्‍यक ती कामे केली जातील.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

पुणे : शहरातील सर्वच रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रक दिव्यांची (सिग्नल व्यवस्था) महापालिका दुरुस्ती करणार आहे. या कामांसाठी सुमारे 70 लाखांची तरतूद असून, पुढील दोन महिन्यांत ही कामे करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता खासगी कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे.

शहरातील विविध रस्ते आणि चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध भागांतील सिग्नल बंद पडत आहेत. त्यातील बहुतेक सिग्नल जुने असून, पावसाळ्यात ते बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळित होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, ज्या भागातील सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे, त्याबाबत वाहतूक पोलिसांशी चर्चा करून कामे करण्यात येणार आहे. या शिवाय, काही सिग्नलची यंत्रणा पूर्णपणे बदलण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: pune news and traffic signal