काश्‍मीर सफरचंदाचा हंगाम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - सिमला सफरचंदाचा हंगाम संपला असून, आता काश्‍मीरभागातील सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी उत्पादन चांगले आहे, अवेळी झालेल्या बर्फवृष्टीमुळे सफरचंदाच्या प्रतीवर परिणाम झाल्याने भावांत विशेष बदल झालेला नाही. 

पुणे - सिमला सफरचंदाचा हंगाम संपला असून, आता काश्‍मीरभागातील सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी उत्पादन चांगले आहे, अवेळी झालेल्या बर्फवृष्टीमुळे सफरचंदाच्या प्रतीवर परिणाम झाल्याने भावांत विशेष बदल झालेला नाही. 

भारतात हिमाचल प्रदेश आणि काश्‍मीर या भागात सफरचंदाचे उत्पादन होते. या भागातून देशभरातील बाजारपेठेत सफरचंदाचा पुरवठा होतो. जुलै महिन्यात हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचा हंगाम सुरू होतो. या सफरचंदाला "सिमला' या नावाने बाजारात ओळखले जाते. साधारणपणे जुलै ते ऑक्‍टोबर मध्यावधीपर्यंत याचा हंगाम असतो. सुरवातीच्या कालावधीत आकाराने लहान असलेल्या मालाची आवक पुण्याच्या बाजारात होते. लालसर आणि चवीला आंबट गोड असे वैशिष्ट्य या सफरचंदाचे असते. ""यावर्षी हिमाचल प्रदेशात उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले होते. परंतु, अति बर्फवृष्टीमुळे सफरचंदाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला होता. सफरचंदाला खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक होते. उत्पादन क्षेत्रात त्याला चिटा असे म्हटले जाते. ज्या उत्पादकांनी नेटचा वापर करून बाग, झाड संरक्षित केले त्यांच्या मालाच्या गुणवत्तेवर काही परिणाम झाला नाही. त्या मालाची चांगल्या भावांत विक्री झाली. हलक्‍या प्रतिच्या मालाला प्रति 25 किलोच्या बॉक्‍सला 800 ते 1200 रुपये इतका आणि चांगल्या प्रतिच्या मालाला 2 हजार 800 ते 3 हजार रुपये इतका भाव मिळाला होता,'' असे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. 

हिमाचल पाठोपाठ आता काश्‍मीर भागातील सफरचंदाचा हंगाम सुरू झाला असून, तेथेही उत्पादन चांगले आहे. हिमाचल प्रदेशप्रमाणेच तेथेही लहरी हवामानाचा फटका उत्पादनाला बसला आहे. लाल आणि पिवळसर रंग, चवीला गोड असे याचे वैशिष्ट्य आहे. याचा हंगाम हा डिसेंबरअखेरपर्यंत राहील. सध्या याला प्रति 15 किलोला 800 ते 1200 रुपये इतका भाव मिळत असल्याचे नमूद केले. ""काश्‍मीरमधील उत्पादकांनी त्यांच्या चांगल्या प्रतिच्या मालाची शीतगृहात साठवण केली आहे. जानेवारी महिन्यात तो माल ते बाजारात आणतील असा अंदाज आहे. यावर्षी चीनमधील सफरचंदाला भारतीय बाजारात बंदी असल्याने त्याचा फायदा येथील उत्पादकांना मिळण्यास मदत होईल. सध्या येणाऱ्या मालाची प्रत ठिक असून, पुढील काळात आणखी चांगल्या प्रतिचा माल बाजारात येईल,''असे जाधव यांनी नमूद केले. 

साधारणपणे पुण्याच्या बाजारपेठेत सफरचंद हे वर्षभर उपलब्ध असते. भारतीय सफरचंदाचा हंगाम जुलै ते डिसेंबर असा असतो. त्यानंतरचे पाच ते सहा महिने युरोपीयन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतून सफरचंद आयात केला जातो. 

Web Title: pune news apple