कलाकाराने दहा मिनिटांचा राग का गावा 

कलाकाराने दहा मिनिटांचा राग का गावा 

पुणे - ""राग जेव्हा विस्ताराने गायला जातो तेव्हा गायकाबरोबरच श्रोतेही स्वतः तो राग होऊन जातात. हा एकरूप होण्याचा अनुभव सुंदर असतो. त्यामुळे असे संगीत ऐकण्याचा हल्लीच्या प्रेक्षकांनी सराव करायला हवा. भारतीय शास्त्रीय संगीत टिकवून ठेवणे हा आपला धर्मच आहे,'' असे मत जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले. लोकांना आवडतो म्हणून कलाकाराने दहा मिनिटांचा राग का गावा, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवानिमित्ताने आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित "अंतरंग' कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात  आरती अंकलीकर-टिकेकर, गायक महेश काळे आणि श्रीनिवास जोशी हे सहभागी झाले होते. त्यांनी "सर्जनाची आव्हाने' या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधला. 

अंकलीकर म्हणाल्या, ""लोकांना आवडतो म्हणून कलाकाराने दहा मिनिटांचा राग का गावा? रागसंगीत गाणारा गायक हा केवळ राग गात नसतो, तर तो संगीताची परंपरा पुढे नेत असतो. विस्तृतपणे गायल्या जाणाऱ्या रागाच्या सुरांमध्ये तरंगणे हा सुंदर अनुभव आपण का बरे गमवावा? त्यामुळे श्रोत्यांनीही एक तासाचा राग ऐकण्याचा सराव करावा. मैफलीच्या ठिकाणी पंधरा मिनिटे आधी पोचून शांतपणे बसावे आणि मग समोरच्या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे सांगावेसे वाटते. केवळ राग गाणारे तेजस्वी गायक तयार व्हावेत, यासाठी त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणी सुटणे गरजेचे असते.'' 

या वेळी अंकलीकर आणि महेश काळे यांनी स्वरचित बंदिशीही ऐकवल्या. "षड्‌ज'ची रजत कपूर दिग्दर्शित "तराना' आणि पी. के. साहा दिग्दर्शित "सारंगी ः द लॉस्ट कॉर्ड' या लघुपटाने सांगता झाली. 

रागाच्या तानांमधून गायकाचे कौशल्य दिसते, परंतु रागाचे खरे सौंदर्य आलापीत असते. "आलापी', "मींड' या खोलवर जाऊन अनुभव घ्यायच्या गोष्टी श्रोत्यांच्या समोर येणे आणि टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. 
- आरती अंकलीकर-टिकेकर 

जोपर्यंत उत्स्फूर्तपणा, तोपर्यंत संगीत 
""अभिषेकीबुवांकडे मिळालेल्या शिक्षणात पेशकश नव्हे, तर साधना हे अंग अधिक होते. रियाजाच्या वेळातच गायक खऱ्या अर्थाने सर्जनशीलता जपत असतो. मैफलीतील सादरीकरण हे हिमनगाचे केवळ टोक असते. स्वैर अंग हे शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत माणसात उत्स्फूर्तपणा टिकून राहील, तोपर्यंत शास्त्रीय संगीत टिकून राहील आणि समयोचित वाटत राहील,'' असे महेश काळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com