पात्रता नसलेल्या शिक्षक भरतीला चाप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना प्राथमिक अध्यापक पदविकेचे (डीएलएड) शिक्षण पूर्ण करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे खासगी शाळांमधील प्रशिक्षित नसलेल्या शिक्षकांच्या भरतीला चाप लागणार आहे. चित्रकलेच्या शिक्षकांनादेखील हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना प्राथमिक अध्यापक पदविकेचे (डीएलएड) शिक्षण पूर्ण करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे खासगी शाळांमधील प्रशिक्षित नसलेल्या शिक्षकांच्या भरतीला चाप लागणार आहे. चित्रकलेच्या शिक्षकांनादेखील हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये केवळ पदवी घेतलेले लोक शिक्षक म्हणून काम करतात. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्यासाठी बालमानसशास्त्र समाविष्ट असलेला पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्‍यक असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. या संबंधीचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना पाठविले असल्याने या पुढे तसे करता येणार नाही.

पाचवीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना २०१९ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. एखाद्या शाळेने प्राथमिक वर्गांसाठी बी.एड्‌. झालेला शिक्षक नियुक्त केला असला, तरी त्याला प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे सक्तीचे आहे. 

याबाबत महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर म्हणाले, ‘‘प्राथमिक शिक्षण पदविका हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक आहे. त्यामध्ये बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आदी विषय समाविष्ट आहे. बी.एड्‌. हा अभ्यासक्रम विशिष्ट विषयाचा आहे.’’

‘‘पाचवीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे आकलन होणे आवश्‍यक असून, त्याप्रमाणे त्याने शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा, असे अपेक्षित आहे. त्यासाठी त्याला प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम सक्तीचा करण्यात आला आहे. शिक्षकाने २०१९ पर्यंत तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेमार्फत हा अभ्यासक्रम चालविला जात आहे,’’ असेही डॉ. मगर यांनी सांगितले.

अर्जासाठी एक दिवस शिल्लक
अप्रशिक्षित शिक्षकांना पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. त्यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या (एनआयओएस) संकेतस्थळावर शिक्षकांनी नोंदणी करायची आहे. विहित मुदतीनंतर शिक्षकांना अर्ज करता येणार नाही, असेही डॉ. सुनील मगर यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news The arbitration of non-qualified teachers