थकबाकीबाबत एकत्रित चर्चा करा - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - महापालिका आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणीसाठा आणि थकबाकीबाबत चर्चा करावी. थकबाकीचा आकडा नेमका किती आहे, हे तपासून मार्ग काढावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचा सल्लाही त्यांनी महापालिकेला दिला. 

महापालिकेकडे सुमारे ४५६ कोटी रुपयांची थकबाकी असून, ती न भरल्यास पाणीपुरवठा तोडण्याबाबतचे पत्र पाटबंधारे खात्याने पालिकेला दिले आहे.

दुसरीकडे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी नसून, चालू वर्षाचे ४० कोटी रुपये भरणे अपेक्षित असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यामुळे दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या वाद सुरू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री बापट, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांत नुकतीच बैठक झाली. या वेळी पालकमंत्र्यांनी दोन्ही खात्यांतील अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी धरणातून घेत असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे, त्यामुळे नेमके किती पाणी घेतले जाते, त्याचा वापर कसा होतो, यावरही चर्चा करण्याची सूचना बापट यांनी केली.

पाटबंधारे खात्याची महापालिकेकडे थकबाकी नाही. तसे पत्र महापालिकेने पाठविले असून, थकबाकीचा तपशीलही मागविला आहे. मात्र, तो न देताच पाटबंधारे खाते थकबाकी जाहीर करीत आहे. त्यानुसार या आठवड्यात दोन्ही खात्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. त्याचा अहवाल पालकमंत्र्यांकडे दिल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेतील गटनेत्यांची बैठक होईल. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि प्रत्यक्ष वापर यांचा आढावा घेऊन, पुढील काळातील नियोजन करण्यात येईल.
 - श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, महापालिका

Web Title: pune news arrears discussion girish bapat