एटीएम तारणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे - आर्थिक वर्षअखेरीला (ता.३१) राष्ट्रीयीकृत बॅंका ग्राहकांसाठी सुरू राहणार आहेत. त्याआधी महावीर जयंती (ता.२९) आणि गुड फ्रायडे (ता.३०)ची सुटी आहे. एक एप्रिलला रविवार आणि दोन एप्रिलला वार्षिक ताळेबंद जुळणीसाठी बॅंकांना सुटी आहे. मात्र, बॅंकांकडे पुरेशी रोकड असल्यामुळे या पाठोपाठ सुट्या असलेल्या कालावधीत एटीएममध्ये पैसे मिळण्यात गैरसोय होणार नाही, असे राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

पुणे - आर्थिक वर्षअखेरीला (ता.३१) राष्ट्रीयीकृत बॅंका ग्राहकांसाठी सुरू राहणार आहेत. त्याआधी महावीर जयंती (ता.२९) आणि गुड फ्रायडे (ता.३०)ची सुटी आहे. एक एप्रिलला रविवार आणि दोन एप्रिलला वार्षिक ताळेबंद जुळणीसाठी बॅंकांना सुटी आहे. मात्र, बॅंकांकडे पुरेशी रोकड असल्यामुळे या पाठोपाठ सुट्या असलेल्या कालावधीत एटीएममध्ये पैसे मिळण्यात गैरसोय होणार नाही, असे राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अखेरच्या दिवशी बॅंका सुरू राहणार असल्याने ग्राहकांना त्यांची कामे करता येतील. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस करदात्यांना विवरणपत्रे भरता यावीत, यासाठी प्राप्तिकर विभागाची कार्यालये २९ ते ३१ मार्चदरम्यान सुरू राहणार आहेत. तीन एप्रिलपासून ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी बॅंकांचे कामकाज नियमित सुरू होईल. 

ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएममध्ये रोकडचा भरणा करावा, असे आदेश एजन्सींज्‌ना दिले आहेत. मात्र, रिझर्व्ह बॅंके कडून (आरबीआय) दोन हजार व पाचशेच्या नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसून, एटीएममध्ये रोकड भरण्याकरिता अन्य बॅंकांकडून रोकड मागविण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसांकरता बुधवारी १८ कोटी रुपये एटीएमसाठी दिल्याचे बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बँका ग्राहकांची गैरसोय टाळणार
 बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक (नियोजन विभाग) राजकिरण भोईर म्हणाले, ‘‘बॅंकेची १२० एटीएम आहेत. बुधवारी (ता.२८) पुढील दोन दिवसांसाठी एटीएममध्ये रोकड भरण्यास सांगण्यात आले. शनिवारी (ता.३१) पुन्हा त्यापुढील दोन दिवसांसाठी एटीएममध्ये रोकडचा भरणा होईल. ’’ स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (पुणे झोन) चे सरव्यवस्थापक आर. एन. दास म्हणाले, ‘‘बॅंकेची पाचशे एटीएम आहेत. ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने बॅंकेकडे पुरेशी रोकड आहे.’’

वीजबिल केंद्र सुरू राहणार 
आर्थिक वर्षाच्या अखेरीस महावितरणने वीजबिल थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. सार्वजनिक सुटिीच्या दिवशी गुरुवार  (ता. २९) व शुक्रवार (ता. ३०) ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकी भरल्यानंतर खंडित पुरवठा सुरू करण्यासाठी  पुनर्जोडणी शुल्क (रिकनेक्‍शन चार्जेस) भरावे लागते. लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी ५० रुपये, थ्री फेज वीजजोडसाठी १०० रुपये आणि उच्चदाब वीजग्राहकांसाठी ५०० रुपये पुनर्जोडणी शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन सोय उपलब्ध नसल्याने थकबाकीदारांनी थकीत रक्कम व पुनर्जोडणी शुल्क कार्यालयीन वेळेत भरावे लागणार आहे. 

टपाल कार्यालय शनिवारी सुरू 
मार्चअखेर असल्याने टपाल विभागाच्या विविध बचत योजनांत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढते. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस साप्ताहिक सुटी असली, तरी शनिवारी टपाल कार्यालये सुरू राहणार आहेत. 

Web Title: pune news atm electricity bill center post office