उपरस्त्यांवर हवी ‘एकेरी’ची अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे - बाजीराव रस्त्याला जोडलेले उपरस्ते यापूर्वीच वाहतुकीसाठी एकाआड एक एकेरी आहेत. पण तेथे वाहतूक पोलिस नसल्यामुळे उपरस्त्यांवरून दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करतात. त्यामुळे बाजीराव रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना प्रत्येक उपरस्त्याला चौकात थांबत जावे लागते. एकेरी उपरस्त्यांवर नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दोन दिवसांपासून पोलिसांनी ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. मात्र प्रत्येक उपरस्त्यावर दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे अजूनही काही ठिकाणी कोंडी होत आहे. 

बाजीराव रस्त्यावरून शनिवारवाड्याकडे जाताना रस्त्यात वाहनचालकांना माजी महापौर मा. र. कारले गुरुजी चौक, अलेक्‍झांडर ग्रॅहम बेल चौक, नातूबाग चौक, नवा विष्णू चौक, पं. भास्करबुवा बखले चौक आणि शनिपार चौक, लिंबराज महाराज चौक, माजी महापौर गणपतराव नलावडे चौक, अप्पा बळवंत चौक, पंडित दत्तात्रेय पळूसकर चौक आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चौकात अडथळ्यांना सामोरे जावे लागते. या चौकांपैकी एकाआड एक चौकांना जोडणाऱ्या उपरस्त्यांवर एकेरी वाहतूक आहे. परंतु वाहनचालकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. तसेच त्या ठिकाणी पोलिस कर्मचारीही नसतात. 

पुरेशा मनुष्यबळाअभावी या एकेरी उपरस्त्यांवर पोलिस कर्मचारी नेमणे शक्‍य नाही. मात्र दोन ते तीन उपरस्त्यांना एक पोलिस कर्मचारी देऊन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 
- सूरज पाटील, सहायक निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक विभाग

विरुद्ध दिशेने आल्यास कारवाई व्हावी
लाल महालाकडून शनिवारवाड्याच्या मागील रस्त्यावरून येणारी वाहने उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने जाणे अपेक्षित आहे. मात्र काही वाहनचालक डावीकडे वळून दक्षिणमुखी मारुती मंदिरापासून विरुद्ध दिशेने बाजीराव रस्त्यावर येतात. त्यांच्यावर कारवाई व्हावी.

Web Title: pune news bajirao raod traffic

टॅग्स