बाजीराव रस्त्यावर कारवाईचा धडाका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच होती. "नो पार्किंग'मधील वाहनांना जॅमर लावण्यासोबतच बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिणामी, बुधवारी या रस्त्यावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. या कारवाईबाबत वाहनचालकांकडून समाधान व्यक्‍त करण्यात येत होते. 

बाजीराव रस्त्यावर पूरम चौक ते शनिवारवाड्यापर्यंत दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अरुंद रस्ता, "नो पार्किंग'मध्ये लावण्यात येणारी वाहने, अंतर्गत उपरस्त्यांवरून बाजीराव रस्त्यावर येणारी वाहने, विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक, पदपथांवर अतिक्रमण आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. 

यासंदर्भात "सकाळ'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करून वाहतूक प्रशासनाला उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याची दखल घेत त्याच दिवशी वाहतूक शाखेचे उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी पोलिसांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार विश्रामबाग आणि खडक वाहतूक पोलिसांनी शाळा, बॅंका आणि दुकानांसमोर "नो पार्किंग'मध्ये थांबलेल्या वाहनचालकांवर कारवाई केली. सहायक निरीक्षक सूरज पाटील आणि शेवाळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजीराव रस्त्यावर कारवाई केली. त्यामुळे वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, ही कारवाई यापुढेही दररोज सुरूच राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणार असल्याचे उपायुक्‍त मोराळे यांनी सांगितले. 

उपायुक्‍तांकडून आढावा 

वाहतूक शाखेचे उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी बुधवारी सकाळी बाजीराव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. 

Web Title: pune news bajirao road traffic police