पुणे - बाजीराव रस्त्यावर कारवाईचे नाटक?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने उभी करतात. परिणामी, वर्दळीच्या कालावधीत येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दोन-चार दिवस कारवाई केली जाते, पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी स्थिती निर्माण होते. 

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने उभी करतात. परिणामी, वर्दळीच्या कालावधीत येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दोन-चार दिवस कारवाई केली जाते, पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी स्थिती निर्माण होते. 

बाजीराव रस्त्यावरील अभिनव चौकापासून शनिवारवाड्यापर्यंत "सकाळ'ने मंगळवारी वाहतुकीचा आढावा घेतला. शनिवारवाड्याच्या दिशेने येताना उजव्या बाजूला "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत; परंतु गणराज हॉटेल, सरस्वती विद्यामंदिर, नातूबाग मंडळाच्या समोरील बाजूस अशा सर्व "नो पार्किंग'च्या ठिकाणी सर्रासपणे वाहने उभी केल्याचे दिसून आले. फर्निचरच्या दुकानांसमोर रस्त्यातच टेंपोमध्ये सामान भरले जाते; तसेच तेथील थांब्याजवळ पीएमपी बस भररस्त्यातच थांबतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. लक्ष्मी रस्त्याजवळ हुजूरपागा विद्यालयासमोर आणि नूमवि शाळेच्या समोरील बाजूस नो-पार्किंगमध्ये मोटारी थांबलेल्या असतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनचालकांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले. 

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा धोका 
बाजीराव रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालय आणि महाराणा प्रताप उद्यानाजवळ वाहनचालक विरुद्ध दिशेने जातात. शनिवारवाड्यालगत फुटक्‍या बुरुजाजवळ अशीच स्थिती आहे. लाल महालाकडून येणारे काही वाहनचालक विरुद्ध दिशेने बाजीराव रस्त्यावर थेट डावीकडे वळतात. त्यामुळे अपघात होण्यासोबतच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिस नसतात. येथे किमान एक वाहतूक पोलिस कर्मचारी नेमल्यास नियमांचे उल्लंघन करण्यावर जरब बसेल. 

दोन्ही बाजूंना "पार्किंग' 
अप्पा बळवंत चौकाच्या पुढे किबे थिएटरपासून मार्केट टी हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जातात. परिणामी, या ठिकाणी रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्याबाबत डोळेझाक केली जात आहे. 

फुटक्‍या बुरजाजवळ कोंडी 
शनिवारवाड्याजवळ फुटका बुरूज ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जातात. डाव्या बाजूला पदपथांवर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्यावर दुचाकींचे पार्किंग आणि भररस्त्यात मोटारी लावल्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

ठोस कारवाईची गरज 
बाजीराव रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वरिष्ठांनी खडक आणि फरासखाना वाहतूक विभागांच्या पोलिस अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. तरीही त्यांच्याकडून "नो पार्किंग'मधील वाहनांवर आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ठोस कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Web Title: pune news bajirao road traffic police

टॅग्स