'बालगंधर्व रंगमंदिर पाडून जन्मशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?'

balgandharva rang mandir
balgandharva rang mandir

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला यावर्षी ८ नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का? अशा शब्दात महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महानगर पालिकेच्या कल्पनेला विरोध केला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगड विटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंत आणि सारस्वतांच्या कलाविष्काराने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. साहित्यिक आणि कलावंतांना उर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सर्जनकेंद्र आहे. या रंगमंदिरात कला सादर करणे, इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे हे नेहमीच कलावंत आणि रसिकांना गौरवाचे वाटते. या वास्तूची निगा आणि देखभाल राखण्यात पूर्णतः अपयशी ठरलेली पुणे महानगरपालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे. समस्त पुणेकर रसिकांच्या भावना लक्षात घेऊन ही वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंकुल उभे करायचे असेल तर ते दुसऱ्या जागेत उभे करावे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना साहित्य आणि कलाक्षेत्रातील लोकांशी बोलून, त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात असे संबंधितांना वाटत नाही, यातच त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे याचा विसर महानगरपालिकेला केव्हाच पडला आहे. पुण्यातला सांस्कृतिक वारसा जतन करण्याबाबतची पुणे महानगरपालिकेची अनास्था चिंताजनक आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे सांस्कृतिक वैभव आहे. या वैभवात भर घालायची सोडून ती वास्तू पाडण्याचा अविचार करणे भूषणावह नाही. कलावंत आणि कलाप्रेमी पुणेकरांच्या भावनांशी खेळू नका जन्मशताब्दी वर्षात तरी गदिमांचे स्मारक करा.

महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाबाबत पुणे महानगरपालिका कमालीची उदासीन आहे. ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आली तरी पुण्यात त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. या वर्षात तरी ते करून दाखवा. पुलंच्या स्मृती जपण्यासाठी महानगरपालिकेने आजवर काय केले? केवळ उद्यानाला नाव देऊन जबाबदारी संपत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com