"बालगंधर्व'कडे महापालिकेचीच पाठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवाकडे खुद्द महापालिकेनेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेचा एकही सोहळा यंदा होणार नाही. शिवाय, ज्या संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा होणार आहे, त्या संस्थेनेही नाटकातील ज्येष्ठ कलावंतांनाच डावलले असल्याची खंत नाट्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन 8 सप्टेंबर 1962 रोजी झाले, तर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 26 जून 1968 रोजी उद्‌घाटन झाले. आता हे रंगमंदिर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या घटनेचे औचित्य साधून पालिकेने एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. त्यामुळे नाट्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. बालगंधर्वांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणारा पुरस्कार सोहळा तेवढा "बालगंधर्व'च्या आवारात होणार आहे. 

विविध नाट्यसंस्था, कलावंत यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या "बालगंधर्व परिवारा'तर्फे दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. तसा तो यंदाही होणार आहे; पण यंदा सुवर्ण महोत्सव असल्याने या सोहळ्याला वेगळा अर्थ आहे. या पार्श्‍वभूमीवर, नाट्य कलावंत रजनी भट म्हणाल्या, ""बालगंधर्व परिवार' या संस्थेने नाटकातील ज्येष्ठ कलावंतांकडे पाठ फिरवून चित्रपटात झळकणाऱ्या कलावंतांना रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभागी करून घेतले आहे. खरंतर नाटकातील कलावंतांची दखल घ्यायला हवी होती.'' 

ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, ललिता देसाई, शमा वैद्य, भारती गोसावी, प्रदीप कांबळी, स्वरूप कुमार, राजश्री आठवले असे अनेक जुने कलावंत नाराज आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

कुठल्याही कलावंतांला आम्ही डावललेले नाही. ज्येष्ठ कलावंतांना शोभायात्रेत सहभागी करून घेतलेले आहे. त्यांची खास व्यवस्था करण्यात आली आहे. 
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, बालगंधर्व परिवार

Web Title: pune news balgandharva rangmandir