अपघातानंतर संतप्त जमावाने एक तास रोखून धरला बारामती रस्ता

विजय मोरे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पप्पू माने याने आपल्या कार्यकर्त्याला फोन करून घटनास्थळी गाडी आणण्यासाठी पाठवले होते. संबंधित कार्यकर्ता घटनास्थळाजवळ येताच संतप्त जमावाला कळल्याने त्या कार्यकर्त्याला पकडून बेदम मारहाण केली.

उंडवडी : आपल्या गाडीखाली दोन शाळकरी मुली चिरडल्यानंतर शिवसेनेचा बारामती शहरप्रमुख पप्पू माने हा घटनास्थळावरुन पळून गेला. जोपर्यंत आपघातग्रस्त गाडीतील सर्व व्यक्ती हजर करत नाहीत तोपर्यंत आम्ही पोलिसांची गाडी सोडणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तब्बल एक तास बारामती - मोरगाव रस्ता बंद असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. 

घटनास्थळावर बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांना समाजावून सांगून जमाव पांगवला. आणि रस्ताही मोकळा करून संबंधित कार्यकर्त्याला घेऊन पोलिस निघून गेले.

दरम्यान, पप्पू माने याने आपल्या कार्यकर्त्याला फोन करून घटनास्थळी गाडी आणण्यासाठी पाठवले होते. संबंधित कार्यकर्ता घटनास्थळाजवळ येताच संतप्त जमावाला कळल्याने त्या कार्यकर्त्याला पकडून बेदम मारहाण केली. घटनास्थळावर पोलिस आल्यानंतर संशयित कार चालकास पोलिसानी ताब्यात घेऊन गाडीत घातले. 

मात्र तीव्र जमावाने पोलिसांची गाडी तब्बल दीड तास अडवली. तसेच बारामती मोरगाव रस्ता रोखून धरला.यामध्ये संतप्त महिलांचाही समावेश आहे. पोलिसांच्या गाडीला काही ग्रामस्थांनी वेढा घातला. घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर उपस्थित झाले. पोलिसांचे संख्या बळ कमी पडल्याने पोलिसांचा नाईलाज झाला. 

बारामती - मोरगाव रस्त्यावरील कऱ्हावागज हद्दीत लष्करवस्ती नजिक पजेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने दोन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. आज सकाळी अंजनगाव ( ता. बारामती) येथील सोमेश्वर विद्यालयात या मुली निघाल्या होत्या. पुणेहून भरधाव वेगाने आलेल्या पजेरो गाडीने समोरून धडक दिल्याने समीक्षा मनोज विटकर (वय 12) व विद्या ज्ञानेश्वर पवार ( वय 13) (दोघीही रा. कऱ्हावागज ता. बारामती) या जागेवर मृत्युमुखीं पडल्या. या घटनेनंतर चालक फरारी झाला असून संतप्त जमावाने गाडी पेटवून दिली आहे. या घटनेने बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news baramati accident people stop police