Baramati News : ज्या मंडपात सत्यनारायण झाला त्याच मंडपात ठेवला मृतदेह; वराचा हृदयविकाराने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati News

Baramati News : ज्या मंडपात सत्यनारायण झाला त्याच मंडपात ठेवला मृतदेह; वराचा हृदयविकाराने मृत्यू

बारामती : घरात विवाह म्हटले,की वधुवरांच्या कुटुंबियांमध्ये आनंद आणि उत्साहाला पारावारा राहत नाही. अर्थात तसेच आनंददायी वातावरण माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथील येळे कुटुंबियांमध्ये होते.परंतु आवघ्या सहा दिवसातच या येळे कुटुंबियांच्या लग्न घरी आनंदावर काळाने दुर्दैवी घाला घातला आणि होत्याचे नव्हते झाले.नवरा मुलगा सचिन उर्फ बबलू अनिल येळे ( वय २५  रा.माळेगाव ) याचे आज गुरूवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले आणि  या दुर्घटनेची माहिती पुढे येताच माळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली.

लग्नाच्या निमित्ताने घरासमोर उभारलेल्या मंडपातच नवरा मुलगा सचिनचा मृतदेह ठेवण्याची वेळ त्याच्या कुटुंबियांवर आली, तर पती सचिन हा आयुष्यातून अचानकपणे गेल्याने परभणी जिल्ह्यातून आलेली नववधू हर्षदा हिची मानसिक अवस्था तर खूपच वेदनादायी दिसून आली. यावेळी मयत सचिनच्या आई-वडीलांसह नातेवाईकांचा लग्न मंडपातील आक्रोश अक्षरशः उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.

सहाजिकच या दुखःत घटनेने माळेगाव परिसरात कमालिची शोककळा पसरली असून एकच हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, माळेगाव साखर कारखान्याचे कर्मचारी अनिल येळे (रा.माळेगाव-येळेवस्ती) यांचा तिसरा मुलगा सचिन येळे यांचा विवाह परभणी येथील हर्षदा हिच्याशी शनिवार रोजी शारदानगरच्या अनुज गार्डनमध्ये मोठ्या उत्साहात  झाला. त्यानंतर या वधूवरांनी रविवार व सोमवारी देवदर्शन केले आणि त्यांची सत्यनारायणाची पुजा मंगळवार रोजी झाली.

पुजेच्या दुसऱ्यांच दिवशी म्हणजे बुधवारी मध्यरात्री सचिन याला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. नातेवाईकांनी त्याला तातडीने वैद्यकिय उपचारासाठी बारामती शहरात नेले, परंतु उपचारापुर्वीच सचिनची प्राणज्योत मावळल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यानुसार गुरवारी पहाटे या दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि माळेगावसह परिसरात अनेकांना धक्का बसला. नातेवाईकांसह माळेगावकरांनी मयत सचिनच्या अंतविधीला मोठी गर्दी केली होती. 

हर्षदाचे स्वप्न उद्धवस्त झाले...!

माळेगावमध्ये येळे कुटुंबियांमध्ये सून म्हणून आलेल्या हर्षदाच्या हातामधील चुडा,मेंदी आणि आंगावरील हळद तशीच होती.असे असताना संसाराच्या सुरवातीलाच अचानकपणे हर्षदाचा पती सचिनचा हृदयविकाराने अंत झाला. या घटनेने मात्र नववधू हर्षदाचे स्वप्न पुर्णतः उद्धवस्त झाले. अर्थात हषर्दाच्या आयुष्यापुढे निर्माण झालेला दांडगा प्रश्न कसा सुटणार,याची चिंता मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे.